वायव्येकडून येणार्या टोळधाडींचा आणि इस्लामचा हिंदुस्थानावर बराच परिणाम झालेला आहे. हिंदू समाजात शिरलेले दोष त्यामुळे स्पष्ट होऊन उघडे पडले. वज्रलेप असे जातिभेद, अस्पृश्यता, असंग्राहकतेची कमालीची झालेली वाढ हे सारे दोष ठळकपणे प्रतीत झाले. हिंदु समाजात ज्यांना अल्पही समतेची वागणूक मिळत नसे, समानतेचे नावनिशाणही ज्यांना वागवताना आढळत नसे अशा लोकांवर इस्लममधील बंधुभावाच्या विचाराचा आणि नुसते तत्त्व म्हणून शाब्दिक का होईना, सारे मुसलमान समान या घोषणेचा अपार परिणाम झाला. या भिन्नभिन्न विचारसरणींच्या धक्काबुक्कीत दोन्ही धर्मांचा समन्वय करण्याचा उद्देश असलेल्या अनेक चळवळी निघाल्या. शिवाय अनेकांनी इस्लाम धर्म घेतला, पण त्यात विशेषत: बंगालमधील खालच्या जातीचे लोकच फार होते. वरिष्ठ वर्गाच्या काही लोकांनी, कधी त्यांना नवा धर्म आवडला म्हणून तर पुष्कळ वेळा राजकीय व आर्थिक कारणांसाठी मुसलमानी धर्म घेतला. सत्ताधीशाचा धर्म घेण्यात उघडउघड पुष्कळच फायदे होते.
परंतु पुष्कळ लोकांनी नवा धर्म स्वीकारला तरीही हिंदू धर्म व त्यातले सगळे पंथ भारतातील प्रभावी व मुख्य धर्म राहिले, आणि ह्या विविध पंथोपपंथांचा हिंदुधर्म चांगला भरभक्कम, असंग्रही, स्वयंपूर्ण, स्वत:च्या धर्ममतावर पक्की अढळ श्रध्दा ठेवून उभा होता. वरिष्ठ जातीच्या लोकांना इस्लाम म्हणजे तत्त्वज्ञान व अध्यात्म या विषयांतील गूढ प्रश्न सोडविण्याबाबत भलत्याच वेड्यावाकड्या दिशेने येऊ पाहणारा धर्म वाटे. विचाराच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात आपण मुसलमानांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ आहोत याविषयी त्यांना तिळभरही शंका नव्हती. इस्लाममधील एकेश्वरी वादही त्यांना स्वत:च्या धर्मात दिसत होता. शिवाय अद्वैत तर त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आधारच होते. एकेश्वरीवाद, अद्वैत किंवा धर्माची इतर सोपी स्वरूपे ज्याने त्याने आपल्या पसंतीनुसार आणि शक्त्यनुरूप जे पाहिजे असेल ते घ्यावे. हिंदू धर्मात अमुक एक नाही असे नव्हते. सगुण ईश्वरावर सत्ता ठेवून सारी भक्ती त्याला अर्पण करावयाची असेल तर वैष्णव बनावे. कोणी अधिक तत्त्वज्ञानी वृत्तीचा असेल तर त्याने ब्रह्ममायेच्या अनंत प्रदेशात शिरून स्वच्छंद विचरावे. हिंदूंची सारी समाजरचना वर्ण, जाती यांवर उभारलेली होती; तेथे व्यक्तीला महत्त्व नसून समूहाला महत्त्व होते. परंतु धर्मक्षेत्रात व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य होते. धर्माचा प्रसार करीत जाण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. काही लोकांनी दुसरा धर्म घेतला तर त्यांना त्याची फिकीर नसे. एकाच गोष्टीला ते जपत. आमच्या समाजरचनेत ढवळाढवळ करू नका; आम्हाला आमच्या पध्दतीने जगू दे, एवढाच त्यांचा आग्रह. एखाद्या पोटजातीला, समूहाला विशिष्ट रीतीने वागायचे असेल तर त्याला मोकळीक असे. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, इस्लाममध्ये जे जात ते संघश: एकदम जात, जातीच्या जाती नवा धर्म घेत. जातीचा संघाचा मनावर एवढा मोठा प्रबळ संस्कार होता. वरिष्ठ वर्गातील ही ती व्यक्ती धर्मांतर करी; परंतु खाली पाहाल तर त्या त्या गावातील एखादी जातच्या जात किंवा सारा गावच्या गाव एकदम नवा धर्म घेई, आणि यामुळे पूर्वीचे ते सामुदायिक जीवन पुढे चालू राही. पूजाप्रकारात थोडाफार काय फरक होईल तो होईल, बाकी सारे तेच जीवन, तेच संबंध आणि यामुळेच काही काही धंदे केवळ मुसलमानांचेच असे आपणांस दिसते. विणकर वर्ग हा पुष्कळसा व काही ठिकाणी सगळाच्या सगळा मुस्लिम आहे. चपला, बूट, जोडे वगैरेंचे व्यापारी, तसेच खाटीक हेही मुसलमान असत. शिंपीही बहुतेक मुसलमान असतात. नाना प्रकारचे कारागीर आणि बांधकाम करणारे हे बहुधा मुसलमान असतात. आज जाती मोडत चालल्यामुळे, सांघिक जीवन कमी होत असल्यामुळे अनेकांनी अनेक धंदे उचललेले दिसतात. यामुळे धंदेवाईक जातींची विभागरेषा आज तितकी स्पष्ट नाही, ती पुसली जात आहे. ब्रिटिशांच्या सत्तेच्या आरंभीच्या काळात ग्रामीण उद्योगधंदे आणि नाना हुन्नर हेतुपुरस्सर नष्ट करण्यात आले; आणि पुढे नवीन वासाहतिक व्यवस्थेच्या अर्धवाढीमुळे अधिकच बेकारी वाढली. हे कारागीर, हरहुन्नरी लोक देशोधडीला लागले. विशेषत: विणकर तर कंगाल झाले. त्यांचा धंदा गेला, उपजीविका गेली. या अरिष्टातून जे वाचले ते खेड्यात शेतीकडे वळले; भाऊबंदांबरोबर वीतभर जमिनीत ते हिस्सेदार झाले किंवा शेतीवर खपणारे भूमिहीन मजूर झाले.
धर्मान्तरात बळजबरी किंवा सक्ती असली तरच लोकांना चीड येई, संताप येई, परंतु व्यक्ती वा जाती यांनी आपणहून परधर्म स्वीकारला तर विशेष विरोध होत नसावा. मित्र, आप्तेष्ट, शेजारी नाराज होत, परंतु एकंदर हिंदू समाज या स्वेच्छापूर्ण धर्मांतराकडे लक्ष देत नसे. त्या काळातील या उदासीन व बेफिकीर वृत्तीशी आजची वृत्ती तोलून बघावी. आज परधर्मात जर कोणी गेला तर सर्वांचे लक्ष एकदम तिकडे जाते. सारे संतापतात, मग इस्लाम धर्मात जाणे असो वा ख्रिस्ती धर्मात जाणे असो. याला राजकीय कारणे आहेत, आणि स्वतंत्र धार्मिक मतदारसंघ निर्माण केल्यामुळे तर ही गोष्ट विशेष जाणवू लागली. आपल्या धर्मात एक नवीन मनुष्य आणणे म्हणजे आपल्या समुदायाचा फायदा. अधिक प्रतिनिधी त्यामुळे मिळतील आणि अधिक राजकीय सत्ता हाती येईल. खानेसुमारीतही अधिक संख्या दिसावी म्हणूनही नाना कारस्थाने, युक्त्या-प्रयुक्त्या केल्या जातात. ही राजकीय कारणे दूर ठेवली तरी हिंदुधर्मातही दुसर्यांना स्वधर्मात आणण्याची वृत्ती वाढत आहे, अ-हिंदूंना हिंदू करण्याची वृत्ती दिसून येत आहे. इस्लामचा हिंदुधर्मावर झालेला हा एक प्रत्यक्ष असा परिणाम आहे. अर्थात यामुळे हिंदुस्थानातील इस्लामशी झगडे होतात, खटके उडतात. सनातनी हिंदूंना अजूनही ही गोष्ट पसंत नाही.