परंतु आता या देशाला अर्वाचीन युगाची, आधुनिक शास्त्रांची धडक येऊन पोचल्यामुळे प्रत्यक्ष घटनांचा अधिक विचार होऊ लागला आहे, पुराव्याची छाननी करून मग काय ते ठरविण्याची वृत्ती आली आहे. केवळ परंपरागत म्हणूनच कोणतीही गोष्ट मानायची तयारी राहिली नाही. कितीतरी तज्ज्ञ इतिहासकार आता कामाला लागले आहेत, परंतु त्यांची दुसर्या टोकाकडची चूक होते. जिवंत असा इतिहास निर्माण करण्याऐवजी केवळ घडामोडींचा जंत्रीवजा बारीकसारीक तारखा व बिनचूक शके, सन यांनीच भरलेला एक निर्जीव इतिहास ते तयार करतात. परंतु असे प्रयत्न होत असूनही एखादे वेळी एकदम पूर्वपरंपरेच्या अभिमानाची लाट येऊन बुध्दिमान माणसाचीही चिकित्सा-दृष्टी आंधळी होते, हा चमत्कार आहे. आजच्या गुलामीच्या काळात राष्ट्रीय भावना मनात पेटत असल्यामुळे हे होत असावे. जेव्हा आपण राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या संपूर्ण स्वतंत्र होऊ तेव्हाच आपले डोके चिकित्सात्मक दृष्टीने, भावनावश न होता, शांतपणे सरळ चालेल.
चिकित्सक दृष्टीने आणि राष्ट्रीय परंपरा यांच्यात कसा बेबनाव येतो याचे नुकतेच एक उदाहरण घडले ते आपल्या या वृत्तीवर प्रकाश पाडणारे आहे. हिंदुस्थानच्या बर्याचशा भागात विक्रम संवत चालतो. हे विक्रम संवत पंचांग सूर्यमानावर चालते. परंतु महिने चांद्र आहेत. १९४४ च्या एप्रिल महिन्यात या पंचांगाप्रमाणे दोन हजार वर्षे होऊन नवीन सहस्त्र सुरू होणार होता. हिंदुस्थानभर त्या वेळेस मोठमोठे समारंभ झाले आणि ते उत्सव-समारंभ योग्यच होते. कारण कालगणनेत एक नवीन आरंभ- दोन हजार वर्षे पुरी होऊन तिसर्या हजाराचा आरंभ होत होता. शिवाय ज्याच्या नावाने हा संवत सुरू आहे, हे पंचांग सुरू आहे तो या देशातला सर्वसामान्य लोकांच्या परंपरागत समजुतीप्रमाणे एक महापराक्रमी वीर पुरुष म्हणून प्राचीन कालापासून प्रसिध्द आहे, त्यांच्यासंबंधी अगणित आख्यायिका आहेत, व त्यातल्या कितीतरी आख्यायिक मध्ययुगीन काळात नानारूपांनी सबंध आशिया खंडात पसरल्या व पुढे त्या युरोपातही प्रचलित झाल्या.
या राष्ट्राचा एक महापुरुष, आदर्श नेता, सकलगुणैश्वर्यसंपन्न राजा म्हणून विक्रम राजाची ख्याती फार प्राचीन काळापासून आहे. देश जिंकायला आलेल्या परकीयांचा पराभव करून त्यांना पिटून, हाकून लावणारा वीर म्हणून तो स्मरणीच विभूती मानतात. पण त्याने आपल्या दरबारात 'नवरत्ने' म्हणून ओळखले जाणारे कवी, कलावन्त व संगीततज्ज्ञ एकत्र आणले त्यामुळे त्याच्या राजसभेत साहित्य, संगीत व कला यांची प्रभा फाकली म्हणून त्याची विशेष कीर्ती आहे. बहुतेक सर्व आख्यायिकांतून विक्रमाची आपल्या प्रजेच्या कल्याणाची कळकळ व कसल्याची निमित्ताने लोकांचे भेले करण्याकरता स्वसुखाचा त्याग, वेळेवर प्राणसुध्दा देण्याची तयारी दाखविली आहे. उदार, शूर व कसलाही अहंकार न बाळगता लोकांच्या कामात तत्पर अशी त्याची प्रसिध्दी आहे. परंतु तो मुख्यत: लोकप्रिय झाला आहे तो सच्छील, सदाचारसंपन्न माणूस, साहित्य, संगीत, कला यांची कदर ठेवणारा आश्रयदाता-अशा त्याच्या गुणांमुळेच झाला. त्याच्या आख्यायिकांतून तो एक विजयी सेनापती होता किंवा त्याने लढाया मारून दिग्विजय केला असा त्याचा उल्लेख क्वचितच येतो. एक भला स्वार्थत्यागी मनुष्य म्हणून विक्रमाची मुख्यत: कीर्ती झाली. यावरून माणसाचे चारित्र्य व त्यागवृत्ती यांनाच मान देण्याची आपली विशेष मनोवृत्ती, आपले हिंदी ध्येय स्पष्ट होते. सीझरच्या नावाप्रमाणे विक्रमाचे नाव प्रतीक बनले, पदवी बनले; आणि त्याच्या नंतरच्या अनेक राजांनी हे नाव स्वत:ला जोडले. त्यामुळे इतिहासात अनेक विक्रमादित्य येऊन गोंधळ उडाला.
पण पहिला खरा विक्रमादित्य कोण ? त्याचा काळ कोणता ? ऐतिहासिक दृष्टीने पाहू तर सारा गोंधळ आहे. ख्रिस्तपूर्व ५७ च्या सुमारास असा विक्रमादित्य कोणी दिसत नाही. परंतु विक्रम संवत तर त्या वर्षापासून सुरू व्हावा. इसवी सनाच्या चौथ्या शतकात एक विक्रमादित्य उत्तर हिंदुस्थानात झाला. त्याने चालून आलेल्या हूणांचा युध्दात पराभव करून त्यांना देशाबाहेर काढून लावले. नवरत्ने आपल्या दरबारात ठेवणारा म्हणून याच्याच संबंधी आख्यायिक गुंफल्या गेल्या. परंतु मग असा प्रश्न उभा राहतो की इसवी सनातील चौथ्या शतकातील या विक्रमाचा इसवी सनापूर्वी ५७ मध्ये झालेल्या विक्रमाशी मेळ कसा घालायचा ? संभव असा आहे की, मध्यहिंदुस्थानातील मालव भागात इसवी सनापूर्वी ५७ मध्ये सुरू झालेला संवत सुरू असावा आणि विक्रम होऊन गेल्यावर पुष्कळ वर्षांनी तो प्राचीन संवत आणि ते पंचांग नव्याने त्याच्या नावाशी जोडले गेले असावे. परंतु हे सारे तर्क आहेत. सारे अनिश्चित आहे.
परंतु परंपरागत विक्रमराजा दोन हजार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या संवत्सराशी जोडण्यासाठी मी मी म्हणणारे बुध्दिमान इतिहासकारही परंपरेच्या आहारी कसे गेले ते पाहून आश्चर्य वाटते. त्याने परकीयांना हाकलून दिले; एक राष्ट्रीय सरकार निर्मून सार्या हिंदुस्थानचे राजकीय ऐक्य स्थापण्याचा त्याचा प्रयत्न होता इत्यादी गोष्टी मांडून त्यांच्यावर जोर देण्यात येतो. विक्रमाचे राज्य तर मध्यहिंदुस्थान व माळवा यांच्यावर होते.