दोन्ही पक्षांपुढे एकाच स्वरूपाचे संकट कोसळण्याचा प्रसंग येऊन उभा राहिला म्हणजे मागचा इतिहास उकरून काढून तोच उगाळीत बसण्याचे त्यांचे वेड कमी होते व प्रस्तुत काळाचा विचार प्रस्तुत प्रसंगी दोघांचेही आता पुढे काय व्हायचे या दृष्टीने दोघेही करू लागतात. पण झाले आहे ते असे की पूर्वीचीच उजळणी होते आहे, एवढेच नव्हे तर त्या पूर्वेतिहासात हल्लीच्या काळात जे काय घडते आहे त्याचीही अशी काही भर पडते आहे की, त्याचा मोठा खेद वाटावा. समजुतीने काही ऐकून घेण्याची वृत्ती जाऊन त्या जागी कठोर, कडू वृत्ती आली आहे. आणखी तंटेभांडणे होऊन किंवा तशी न होता काही तरी तडजोड निघणार, आज ना उद्या, केव्हातरी होणार हे नक्की, पण अशी निघालेली तडजोड खरीखुरी, मनापासून व उभयपक्षांच्या सहकार्याच्या दृष्टीने होण्याचा संभव फारच कमी, बहुधा होईल ते असे की कठीण परिस्थिती उभयतांच्याही मानगुटी बसल्यामुळे दोघांनाही ती मुकाट्याने सोसणे भाग होईल, आणि दोघांमध्ये आहे तोच अविश्वास व द्वेष पुढेही तसाच राहील. हिंदुस्थान हा ब्रिटिश साम्राज्याचा हल्ली एक भाग आहे तो केवळ तात्विक दृष्ट्या नावापुरता का होईना, तसाच राहावा असे गृहीत धरून उभयतांमधील प्रश्नांचे काही उत्तर कोणी काढू म्हणेल तर ते उत्तर मान्य होण्याचा किंवा आपले म्हणून उभयपक्षी स्वीकारले जाण्याचा संभव मुळीच नाही. हिंदुस्थानातील सरंजामशाहीचे राहिलेले अवशेष कायम ठेवून काही उपाय योजना तर तो उपाय टिकणे अशक्य आहे.
हिंदुस्थानात माणसाला काही किंमत नाही, त्याच्या जीवनाला काही मोल नाही. ही अवस्था कोठेंही आली की ते जीवन हेतुशून्य, उग्र आणि काहीतरीच अगदी तकलुपी आहे असे वाटू लागते आणि दारिद्र्यातून निघणार्या असंख्य भेसूर दैन्यांचे लटांबर त्या जीवनाभोवती घोटाळत राहते. हिंदुस्थानातील परिस्थिती माणसाला नि:शक्त, नि:सत्त्व करून टाकणारी आहे, त्याला काही स्वाभाविक तर काही लोकांवर लादलेली कृत्रिम कारणे तशी अनेक आहेत, पण मुख्य कारण म्हणजे लोकांत पसरलेले दारिद्र्य व दुर्भिक्ष. आमच्याकडच्या लोकांची राहणी अत्यंत कमी दर्जाची, आणि मृत्यूचे प्रमाण तसेच भलते अफाट. एखादा श्रीमंत मनुष्य ज्या दृष्टीने दुर्दैवी दरिद्री लोकांकडे पाहतो, त्याच दृष्टीने यांत्रिक उद्योगधंद्यांची वाढ होऊन गबर झालेले देश तशी वाढ न झालेल्या गरीब देशांकडे पाहतात. श्रीमंताची संपत्ती खूप, त्याला संधी हव्या तेवढ्या मिळणार, त्यामुळे त्याला सार्या गोष्टी सर्वांत उत्तम असतील त्याच लागतात, त्याच्या अभिरुचीला इकडचे तिकडे झालेले मुळीच खपत नाही, आणि मग तो गरिबांच्या लागलेल्या वाईट सवयी व गरिबांचा गबाळेपणा याबद्दल त्या गरिबांना दोष देत सुटतो. त्यांना स्वत:ला सुधारण्याची संधी या श्रीमंताने कधीच मिळू दिलेली नसते, पण त्यांना पुढेही संधी मिळू नये याचे समर्थन करायला त्यांची गरिबी आणि त्या गरिबीबरोबर अर्थातच येणारे अनेक वाईटसाईट प्रकार हीच कारणे दाखविली जातात.
हिंदुस्थान देश दरिद्री नाही. संपन्न देशांत गणना व्हायला जे जे काही देशात असायला पाहिजे ते हिंदुस्थानात भरपूर आहे, पण हिंदुस्थानातले लोकमात्र फार दरिद्री आहेत. संस्कृतीची नानाविध रूपे हिंदुस्थानच्या संग्रही आहेतच, तो वंशपरंपरा आलेला, हिंदुस्थानला मिळालेला बहुमोल बहुगुणी ठेवा आहेच. संस्कृतिविकासाचे सुप्त सामर्थ्यही हिंदुस्थानच्या अंगी फार मोठे आहे, पण नव्या निघालेल्या अनेक प्रकारांची, संस्कृतीच्या उपकरणांची मात्र उणीव आहे. ही उणीव अनेक कारणांनी आलेली आहे, पण मुख्यत: हे सारे प्रकार, ही उपकरणे हिंदुस्थानला इतरांनी मिळू दिली नाहीत हेच मुख्य कारण आहे. अशी परिस्थिती आली म्हणजे लोकांतल्या चैतन्यशक्तीच्या हातूनच असले अडथळे नाहीसे होतात, आणि ही उणीव भरून निघते. हाच प्रकार आज हिंदुस्थानात घडतो आहे. देशाची त्वरेने प्रगती करायला लागणारी नैसर्गिक साधनसंपत्ती तर हिंदुस्थानात आहेच, पण त्याकरिता लागणारी बुध्दिमत्ता, कौशल्य आणि कार्यक्षमता, कौशल्य आणि कार्यक्षमता हीही हिंदुस्थानात आहेत हे धडधडीत स्पष्ट दिसणारे सत्य आहे. हिंदुस्थानाच्या पाठीशी युगायुगांचा सांस्कृतिक व आध्यात्मिक अनुभव उभा आहे. या देशाला विज्ञानाच्या शास्त्रीय सिध्दान्तांच्या व त्या सिध्दान्तांचा प्रत्यक्ष उपयोग करून घेण्याच्या, अशा दोन्ही क्षेत्रांत प्रगती करणे व मोठमोठे यांत्रिकी उद्योगधंदे असलेल्या थोर राष्ट्राची पदवी प्राप्त करून घेणे शक्य आहे. हिंदुस्थानात विज्ञानशास्त्राच्या कार्यात अनेक निर्बंध, अनेक अडचणी आहेत, तेथील तरुण-तरुणींना विज्ञानशास्त्रात कार्य करायला वाव मिळत नाही, ही स्थिती असूनही हिंदुस्थानने एवढ्या अवकाशात केलेली त्या शास्त्रातली कामगिरी नाव घेण्याजोगी झालेली आहे. देशाचा विस्तार केवढा मोठा, व त्या दृष्टीने पाहिले तर किती कार्य होणे शक्य आहे याचा विचार केला तर झाले आहे ते कार्य विपुल आहे असे नाही, पण राष्ट्राची शक्ती मोकळी झाली व भरपूर संधी मिळत गेली तर केवढे कार्य होणार आहे त्याचे ते कार्य म्हणजे प्रसादचिन्ह आहे.