गंभीर परिस्थिती
सन १९४२ या वर्षी पहिले काही महिने हिंदुस्थानात परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत होती. युध्दाची रणभूमी एकसारखी हिंदुस्थानकडे सरकत चालली होतीच, पण त्या सुमारास संभव असा दिसू लागला की, हिंदुस्थानातील मोठमोठ्या शहरांवर वैमानिक हल्ले होऊन बाँब पडणार. जेथे रणधुमाळी सुरू होती त्या पौर्वात्य देशात आता काय काय घडामोंडी घडणार ? हिंदुस्थान व इंग्लंड यांचे जे आजवरचे नाते होते त्यात नवा प्रकार काय येणार ? पूर्वी जे काही घडून चुकले त्यामुळे वैरी बनलेले परंतु कोणाचीही दुसर्यावाचून सुटका नाही असे एकत्र जखडलेले हे दोन देश त्या जुन्या कडू आठवणी काढून एकमेकाकडे पूर्ववत नुसते जळफळत पाहात राहणार, व दोन्ही देशांपुढे उभ्या ठाकलेल्या भीषण भवितव्याला उपाय आपल्या हाती राहिला नाही म्हणून मुकाट्याने बळी जाणार की काय ? का दोघांवरही ओढवलेल्या ह्या संकटाचा उपयोग पुलासारखा होऊन दोघांमध्ये पडलेली वैराची दरी ओलांडून जायला हे संकटच आमच्या कामी येणार ? धंद्याची झापड डोळ्यांवर चढलेल्या सार्या बाजारपेठांतून नेहमीची सुस्ती उडून जाऊन व्यापारीसुध्दा खडबडून उठले व सगळीकडे गडबड पसरून बाजारातून जिकडे तिकडे नानाप्रकारच्या अफवांची गर्दी उडाली. धनिक वर्गाचे जे भविष्य झपाट्याने जवळ जवळ येत चालले होते त्याची धनिकांना धास्ती वाटू लागली. त्या भविष्यकाळात दुसरे काही घडो वा न घडो, पण जी समाजव्यवस्था धनिकांच्या अंगवळणी पडली होती ती डळमळून त्यांचे हितसंबंध, व त्यांचे समाजातले विशेष स्थान, यांना धक्का पोचण्याचा संभव मात्र उत्पन्न झाला होता खास. सामान्य शेतकरी किंवा कामगार यांना तशी धास्ती वाटत नव्हती, कारण काही धामधूम झाली तर नुकसान होण्यासारखे त्यांच्याजवळ फारसे नव्हतेच, उलट त्यांची हल्लीची वाईट स्थिती पालटण्याची त्यांना आशा होती.
चीनवर ओढवलेल्या दुर्दशेमुळे चीन देशाबद्दल हिंदुस्थानात सहानुभूतीची भावना होती व त्यामुळे जपानबद्दल थोडी अप्रीतीची भावनाही होती. प्रथम असे वाटले की, प्रशांत (पॅसिफिक) महासागरावर जे युध्द पेटले त्यामुळेच चीनला थोडीफार उसंत सापडेल. सारखी साडेचार वर्षेपावेतो चीनला एकट्याला जपानशी झुंजत राहावे लागले होते, त्या चीनला प्रबल राष्ट्रांची आता मदत झाली तेव्हा आता तरी चीनवरचा भार कमी होऊन संकट ओसरेल. पण चीनच्या या बड्या दोस्तांनाच तडाख्यावर तडाखे बसू लागले व सारखे पुढे चाललेल्या जपानी सेनांपुढे ब्रिटिशांच्या वसाहती साम्राज्याला जिकडे तिकडे तडे पडून त्याचे तुकडे उडाले. एकूण एवढ्या तोर्यात उभे सलेले हे साम्राज्य म्हणजे पाया नसलेला आतून काही एकजूट नसलेला नुसता एक पत्त्यांचा बांगलाच की काय? आधुनिक काळातल्या युध्दाला अवश्यक अशी फारशी काहीही सामग्री जवळ नसतानाही चीनने जपानी हल्ल्यांना टक्कर देत वर्षेच्या वर्षे टिकाव धरला होता, तेव्हा चीनच्या प्रतिकाराशी ब्रिटिश साम्राज्याच्या ह्या झालेल्या प्रकाराची तुलना लोयक साहजिकच करू लागले. लोकांच्या हिशेबात चीनची किंमत वाढली, आणि जपान जरी लोकांना फारसा प्रिय नव्हता तरी आशियातील एका राष्ट्राच्या सशस्त्र सामर्थ्यांपुढे युरोपातील जुन्या मुरब्बी साम्राज्यवादी राष्ट्रांचा कसा धुव्वा उडाला ते पाहून लोकांना एक प्रकारे बरे वाटत होते. ही वंशभेदाची, पौर्वात्य आशियायी भावना ब्रिटिशांच्या मनातही असल्याचे दिसत होते. त्यांचा सारखा पराभव होता होता अनर्थ ओढवला त्यामुळे त्यांना संताप आला तर होताच पण त्याशिवाय त्यांना विशेष मानहानी वाटून त्यांच्या मलाना ही गोष्ट फार झोंबली की, एका पौर्वात्य आशियानी राष्ट्राने त्यांच्यावर अशी मात करावी. एक मोठा इंग्रज अधिकारी असेही म्हणाला की, प्रिन्स ऑफ वेल्स व रिपल्स या लढाऊ जहाजांना या पिवळ्या जपान्यांनी बुडवले त्यापेक्षा त्यांचा अंत जर्मनांच्या हातून झाला असता तर त्यातल्या त्यात काही बरे होते.