देशातील राष्ट्रीय वृत्ती दडपून टाकण्याकरिता कडक उपाय योजायला सरकारला महायुध्दाचे निमित्त पुरेसे झाले, व आपल्या वाटेल त्या कृत्यावर पांघरूण घालायला आणि नव्या नव्या विचित्र कल्पना चालवून आपल्या मताचे ढोलके बडवीत राहायला सरकारला ही सबब चांगली सापडली. आपण जे काम करतो ते चांगल्या कार्याकरिता आहे अशी भावना
कामगारवर्गात उत्पन्न होऊन त्यांना हुरूप यावा म्हणून अलबत्यागलबत्यांना पैसे चारून त्यांच्याकरवी कसलीतरी तकलुपी कामगारमंडळे सरकारने उभी केली. कागदाच्या टंचाईमुळे नेहमीच्या वर्तमानपत्रांना अंक काढणे जड झाले होते तरी गांधी व काँग्रेस यांना अचकटविचकट शिव्या देणारी नवी नवी वर्तमानपत्रे सरकारी साहाय्याने निघाली, त्यांना सरकारने पैशाची मदत चालवली. युध्दकार्य म्हणून सरकारी जाहिरातींचे काम या वर्तमानपत्रांना देण्यात आले. हिंदुस्थान सरकारचे समर्थन करणारा मतप्रसार सतत सुरू ठेवण्याकरिता परदेशांतून ठिकठिकाणी हिंदुस्थानविषयक माहिती देणारी केंद्रे उघडली गेली. ब्रिटिश सरकारला स्वत: नामानिराळे राहून आपले उद्योग चावता यावे व आपला मतप्रसार करता यावा एवढ्याकरिता हिंदुस्थान सरकारतर्फे सरकारी शिष्टमंडळातून, काही नावलौकिक नसलेल्या व ज्यांचे नावही कधी कोणी ऐकले नाही अशाही लोकांचे तोंडे परदेशात, विशेषत: अमेरिकेत रवना झाले. स्वत:ची स्वतंत्र मते असलेल्या किंवा सरकारच्या धोरणावर चर्चा चालवणार्या कोणाही माणसाला हिंदुस्थानबाहेर परदेशी जाण्याची सरकारने संधी ठेवली नव्हती, त्याला बाहेरदेशी जायला सरकारचे अनुमतिपत्र किंवा प्रवासाची काहीही सोय सरकार मिळू देत नव्हते.
सरकारच्या दृष्टीने जिला 'सार्वजनिक शांतता' म्हणायचे, तिचा आभास उत्पन्न करण्याकरिता सरकारने वर दिल्या आहेत त्या व आणखीही कैक युक्त्याप्रयुक्त्या गेली दोन वर्षे चालवल्या आहेत, केवळ सेन्याच्या बळावर एखादा देश ताब्यात ठेवला आणि त्या सैन्याच्या धाकावर तेथले राज्य चालविले, किंवा प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष प्रकार तोच असला तर त्या देशातले राजकीय व सार्वजनिक जीवन सुप्तावस्थेत असणार हे ठरलेलेच आहे. परंतु रोगाची नुसती बाहेरची लक्षणे दडपून टाकली तर आतला रोग बळावतच जाण्याचा संभव असतो. हिंदुस्थानला दुर्धर रोग झालेला आहे. आजपर्यंत सरकारशी नेहमी सहकार्य करण्याची कसोशी करणार्या हिंदी मवाळ पक्षातले मोठमोठे लोक, कसेबसे झाकण घालून बंद करून शिक्का मारलेल्या हा देशभर धुमसणारा ज्वालामुखी पाहून चिंताग्रस्त झाले आहेत, आणि देशात ब्रिटिश सरकारविरुध्द आज आहे इतकी कडू भावना कधीच नव्हती असे त्यांनी बोलून दाखविले आहे.
गेल्या दोन वर्षांत माझ्या देशबांधवांच्या मनोवृत्तीत काय स्थित्यंतर झाले आहे ते मला माहीत नाही व म्हणून त्यांच्या माझ्या पुन्हा गाठीभेटी होईपर्यंत मला त्याबद्दल काही सांगता येत नाही. पण माझी अशी खात्री आहे की, त्यांना नुकतेच हे जे काही अनुभव आले त्यामुळे त्यांच्यात नानाप्रकारे स्थित्यंतर झाले असणारच. माझी स्वत:ची मनोवृत्ती वेळोवेळी कशा प्रकारे पालटत गेली ते मी पाहात आलो आहे, जे काही घडत गेले त्यामुळे माझ्या मनोवृत्तीवर माझी तशी इच्छा नसूनही आपोआप काय परिणाम झाला ते मी तपासून पाहिले आहे. यापूर्वी इंग्लंडला एक फेरी मारून यायचे म्हटले की मला आनंद होई, कारण तिथले माझे अनेक मित्र आहेत व जुन्या आठवणींनी इंग्लंडची ओढ मनाला लागे. पण आज आता माझे मन मी तपासून पाहिले तर मला असे आढळले की, मला इंग्लंडची फेरी करायची इच्छा नाही, काही जाऊ नये इंग्लंडला असेच उलट वाटले. मला असे वाटू लागले की, इंग्लंडपासून शक्य तितके लांब राहावे, हिंदुस्थानच्या प्रश्नाबाबत कोणा इंग्रजाशी काही चर्चासुध्दा करू नये. पण मग मला काही इंग्रज मित्रांची आठवण येऊन मन थोडे द्रवले, आणि मी स्वत:शी म्हणू लागलो की, अशा तर्हेने एखाद्या सबंध देशाची, तेथल्या सार्या लोकांची किंमत करणे अगदी अन्याय्य आहे. इंग्रज लोकांना ह्या महायुध्दात कसली खडतर दिव्ये करावी लागली आहेत, महायुध्दाच्या कालात त्यांचे सारे जीवन कसे चिंतेने सतत व्यापलेले आहे, कैक जणांना आपल्या आपत-बंधुबांधवांच्या चिरवियोगाचा किती शोक करावा लागतो आहे, हेही विचार माझ्या मनात आले. ह्या सर्व विचारांनंतर इंग्लंडबद्दलची माझी भावना थोडी कमी झाली खरी, पण मुळातला आलेला कडूपणा कायम राहिला. कदाचित कालांतराने व पुढे तसे काही घडले तर तोही कमी होईल, मला काही एक वेगळी दृष्टी इंग्लंडबद्दल येईल. पण इंग्लंड देश व इंग्रज लोक यांच्याशी इतके निकट संबंध असूनही माझी स्वत:ची मनोवृत्ती ही होऊ शकली, तर ज्यांचा इंग्लंड किंवा तेथले इंग्रज यांच्याशी कधीच माझ्यासारखा संबंध आला नाही त्यांची मनोवृत्ती काय झाली असेल ?