अफगाण सत्तेचा हिंदुस्थानवर आणि हिंदुधर्मावर विविध परिणाम झाला, आणि हे परिणाम परस्परविरोधी असे होते.  एक तात्कालिक प्रतिक्रिया अशी झाली की, हजारो लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे, अफगाणी सत्तेपासून दूर जाऊ लागले.  परंतु जे अफगाणी सत्तेखाली राहिले ते, आचाराने फार कडक होऊन, संपर्क टाळण्याकरता, ते जणू आपल्या कवचात घुसून बसले व परकीयांच्या चालीरीतींपासून, त्यांच्या वर्चस्वापासून स्वसंरक्षण करण्यासाठी त्यांनी चातुरर्वर्ण्याचे बंधन अधिकच घट्ट केले.  परंतु एकीकडे हा असा परिणाम होत असताना दुसरीकडे हळूहळू जीवनावर आणि विचारावर या परकी गोष्टींचा, त्यांच्या राहणी-सवरणीचा परिणाम नकळत हळूहळू होतच होता.  एक प्रकारचा समन्वय होत होता; नवीन शिल्पपध्दती जन्माला आल्या; खाण्या-पिण्यात, पेहरावात बदल झाले, जीवनावर अनेक नवे संस्कार होऊ लागले आणि कितीतरी विविध प्रकार दिसू लागले.  संगीतात तर हा समन्वय अधिकच दिसून आला.  हिंदी संगीत शास्त्रात तर जुनी भारतीय पध्दती आधाराला घेऊन कितीतरी नवे प्रकार आले, विविधता आली.  पर्शियन भाषा दरबारची, राज्यकारभाराची भाषा बनली, आणि कितीतरी पर्शियन शब्द लोकांच्या बोलण्यात येऊ लागले.  याच काळात लोकांच्या भाषाही समृध्द होत होत्या, वाढत होत्या.

परंतु अनिष्ट असे जे काही परिणाम झाले, त्यांतील पडदापध्दतीही एक होय.  स्त्रिया पडदानशील झाल्या.  ही पध्दती का आली ते कळत नाही; परंतु नवीनामुळे जुन्यावर ज्या
-----------------------------

*  सर एच. एम. ईलियट-'हिंदुस्थानचा इतिहास' : खंड १ ला -पृष्ठ ८८.

काही प्रतिक्रिया होत होत्या, त्यांतूनच हा पडदा जन्माला आला, यात शंका नाही.  हिंदूस्थानात पूर्वीही खानदानी घराण्यात स्त्रिया फारशा पुरुष समाजात मिसळत नसत, त्यांची स्वतंत्र व्यवस्था असे.  इतरही देशांमध्ये विशेषत: ग्रीसमध्येही ही चाल होती.  प्राचीन इराणातही स्त्रिया पुरुषांत फारशा मिसळत नसत; बहुतेक सर्व पश्चिम आशियात ही पध्दती होती.  परंतु स्त्रियांना अजिबात अलग ठेवण्याचा कडक निर्बंध कोठेही नव्हता. ही पध्दती बहुधा रोमच्या पूर्व साम्राज्यातून आली असावी.  या बायझंटाईन राजवाड्यांतून, खानदानी घराण्यांतून स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी खच्ची केलेल्या नपुसंकांचा उपयोग करण्यात येत असे.  ते अंत:पुरावर देखरेख करीत.  रोमन साम्राज्यातील हे प्रकार रशियातही गेले.  पीटर दी ग्रेटच्या काळापर्यंत रशियात स्त्रियांना पुरुषांना मिसळण्याची जवळजवळ बंदीच होती.  पडदा पध्दती तार्तरांमुळे आलेली नाही.  तार्तर लोकांत स्त्रियांना मोकळीक होती.  त्यांना केवळ अलग ठेवण्यात येत नसे.  बायझंटाईन रीतिरिवाजांचा अरबी-इराणी संस्कृतीवर पुष्कळ परिणाम झाला होता; आणि वरिष्ठ वर्गात तरी स्त्रियांना अलग ठेवण्याची, पडद्यात ठेवण्याची चाल आली असावी.  तरीही अरबस्थानात किंवा पश्चिम व मध्य आशियातील भागात स्त्रियांना संपूर्णपणे अलग ठेवण्याची कडक पध्दती नव्हती.  दिल्ली हातात आल्यावर अफगाणांच्या झुंडीच्या झुंडी हिंदुस्थानात येऊ लागल्या.  परंतु त्यांच्यातही तितका गोषा नव्हता.  तुर्की आणि अफगाण राजकन्या, राजसुंदरी, सरदार घराण्यातील प्रतिष्ठित स्त्रिया घोड्यावर बसून जात, शिकार करीत, भेटीगाठी घ्यायला जात, मक्केला हाज यात्रेच्या वेळेला स्त्रियांनी आपली तोंडे अनावृत ठेवण्याची जुनी पध्दत अद्यापही चालू आहे.  मोगल काळात हिंदुस्थानात पडता-पध्दती वाढली असावी.  पडदा म्हणजे प्रतिष्ठेची खूण असे हिंदु-मुसलमान दोघेही समजू लागले.  विशेषत: ज्या प्रदेशात मुसलमानी वर्चस्व अधिक होते त्यातील वरिष्ठ वर्गात हा पडदा अधिक घुसला.  दिल्ली, संयुक्तप्रांत, रजपुताना, बिहार, बंगाल वगैरे भागांत पडदा पसरला.  परंतु आश्चर्य हे की, पंजाब आणि सरहद्दप्रांत- जे अधिक मुसलमानी भाग आहेत— त्यात पडदा तितकासा प्रखर नाही.  दक्षिण व पश्चिम हिंदुस्थानात काही मुसलमान वगळले तर स्त्रियांना कोठेच प्रतिबंध नाही.  सर्व मोकळेपणा आहे.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel