वाङ्मयातील भवभूती हा शेवटचा तेजस्वी तारा आठव्या शतकात झाला. नंतरही ग्रंथलेखनाचे कार्य सुरू दिसते. परंतु त्यातील भाषाशैली कृत्रिम व अवघड झालेली आहे, सहजता कोठेही नाही; विचारांचा ताजेपणा नाही, शैलीत अभिनवता नाही. गणितात दुसरे भास्कराचार्य हे शेवटचे मोठे नाव. ते बाराव्या शतकात झाले. कलेच्या बाबतीत हॅव्हेलच्या मते चौदाव्या शतकापर्यंत जिवंतपणा टिकला होता. तो म्हणतो सातव्या-आठव्या शतकापर्यंत कलेच्या आविष्कारणाचे स्वरूप पूर्णपणे परिणत झालेले नव्हते. याच काळात मोठमोठी लेणी, चित्रकामे निर्माण झाली. सातव्या-आठव्या शतकापासून तो चौदाव्या शतकापर्यंत भारतीय कलेचा विकासकाल होय, याच काळात युरोपात गॉथिक कला कळसाचा पोचली. सोळाव्या शतकात प्राचीन भारतीय कलेतील सर्जनशक्ती संपुष्टात येत चालल्याचे स्पष्टपणे दिसून येऊ लागले. हॅव्हेलचे म्हणणे कितपत यथार्थ आहे ते मला माहीत नाही. परंतु कलेच्याही बाबतीत जर कोणी प्राचीन परंपरा पुढे चालविली असेल तर ती उत्तरेपेक्षा दक्षिण हिंदुस्थानानेच जास्त काळ चालविली.
वसाहतींसाठी शेवटचा मोठा हिंदी प्रयत्न नवव्या शतकात झाला, तो दक्षिणेकडूनच झाला. नंतरही चोल राजे अकराव्या शतकापर्यंत प्रभावी समुद्रसत्ताधारी होते. श्रीविजयाचा त्यांनी पराजय करून त्याला जिंकून घेतले होते.
ह्याप्रमाणे हा भारतदेव वाळत चालला, काही नवे निर्माण करण्याला त्याला बुध्दी किंवा शक्ती उरली नाही. हा वाळत जाण्याचा रोग हळूहळू कैक शतकांपर्यंत चालला होता. तो प्रथम उत्तरेकडे लागला व शेवटी दक्षिणेपर्यंत पसरला. हा राजकीय र्हास होण्याची, संस्कृतिप्रवाह थांबून डबके होण्याची कारणे कोणती असतील ? व्यक्तीप्रमाणेच संस्कृतीलाही घेरणारा काळाचा प्रभाव हे एकच कारण असेल काय, का भरती-ओहोटीत एखादी लाट येते व जाते तसे झाले असेल ? का देशाबाहेर घडलेल्या काही घटना किंवा प्रत्यक्ष या देशावर झालेल्या आक्रमणामुळे हा प्रसंग आला ? राधाकृष्णन म्हणतात की, राजकीय स्वातंत्र्य लोपल्यामुळे हिंदी तत्त्वज्ञानातील तेज गेले. सिल्व्हा लेव्हीही म्हणतात, ''हिंदी स्वातंत्र्याबरोबरच आर्यसंस्कृतीही संपली; नवीन वाङ्मये आली, त्यांनी हल्ले चढवून गीर्वाण संस्कृतीची हकालपट्टी केली, आता ती महाविद्यालयांचा आधार घेऊन राहिली आहे. एक प्रकारच्या पंडिती वातावरणात ती वावरत आहे, जनतेशी संबंध उरला नाही.''
हे सारे खरे आहे, कारण राजकीय स्वातंत्र्य नष्ट झाले तर सांस्कृतिक र्हासाला अपरिहार्यपणे आरंभ होतोच. परंतु राजकीय स्वातंत्र्य तरी का गेले ? काहीतरी रोजबीज कोठे तरी शिरले होते म्हणूनच की नाही ? कोठेतरी अवकळा सुरू झालीच होती. एखाद्या लहान देशावर बलाढ्य शत्रूने आक्रमण केले तर तो देश गुलाम होणे अपरिहार्य असते. परंतु हिंदुस्थान म्हणजे केवढा देश, किती पुढारलेला, सुधारलेला, त्याची थोर संस्कृती असे असूनही परकीय आक्रमणासमोर तो टिकाव धरू शकला नाही याचा अर्थ हाच नाही का की कोठेतरी अंतर्गत विनाशबीजे होती ? किंवा आक्रमकाजवळ तरी अधिक प्रभावी युध्दतंत्र असले पाहिजे. परंतु ख्रिस्त शकाच्या पहिल्या हजार वर्षांनंतर अंतर्गत नाशाची चिन्हे स्पष्ट दिसू लागलीच होती.