राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे सामर्थ्य व आत्मविश्वास वाढत चालला तेव्हा अनेकांच्या मनात, स्वतंत्र हिंदुस्थान ही सिध्दस्थिती झाली म्हणजे देश कसा असेल, तो काय काय करील, त्याचे परराष्ट्रांशी संबंध कसे असतील, अश दिशेने विचार घोळू लागले. देशाचा विस्तार मोठा विशाल, व काही कार्य करू म्हटले तर वापरता येण्याजोगे परंतु हल्ली सुप्त असलेले सामर्थ्य व साधनसंपन्नताही विशाल, त्यामुळे लोकांच्या मनात घोळणारे विचारही विशाल प्रमाणावरचे असणे प्राप्तच होते. कोणत्याही राष्ट्राचा किंवा राष्ट्रसमूहाचा केवळ आश्रित म्हणून राहणे हिंदुस्थानला शक्यच नव्हते. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून देशाची वाढ पूर्णावस्थेला येऊ लागली की, त्यामुळे आशिया खंड व अर्थातच त्या ओघाने जगाच्या परिस्थितीत मोठे स्थित्यंतर होणार होते. कोणाचे आश्रित म्हणून राहायचे नसेल तर ज्या बंधनांनी हा देश इंग्लंड देशाशी बांधलेला होता ती इंग्लंड व ब्रिटिश साम्राज्याची बंधने तोडून देश संपूर्णपणे स्वतंत्र असणे ही कल्पना पाठोपाठ आलीच. साम्राज्यांतर्गत वसाहतीचे स्वराज्य म्हटले की त्यात जवळजवळ स्वतंत्र देशाचा दर्जा आला, पण त्या स्थितीचे सुध्दा चमत्कारिक बंधन होणार व राष्ट्राची पूर्ण वाढ व्हायला अडचण पडणार. वसाहतीचे स्वराज्य या कल्पनेच्या मुळाशी एक मातृदेश व तिच्याशी घनदाट संबंध असलेली अनेक कन्याराष्ट्रे या सर्वांची सांस्कृतिक पार्श्वभूमी एकच असावयाची, ही कल्पना होती, व ती हिंदुस्थान देशाला मुळीच लागू पडण्यासारखी नव्हती. वसाहतीचे स्वराज्य असले तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याचे क्षेत्र अधिक विस्तृत राहणार, व तसे असणेही इष्टच, परंतु त्याबरोबरच अडचण यायची ती ही की, साम्राज्याच्या किंवा या वसाहती राष्ट्रसमूहाबाहेरच्या देशाशी सहकार्याचे क्षेत्र तितकेच संकुचित होणार. अशी वस्तुस्थिती असल्यामुळे वसाहतीचे स्वराज्य ह्या कल्पनेचे आम्हाला बंधन वाटे व भविष्यकाळातल्या आपल्या ऊर्जितावस्थेच्या कल्पनेने भारावून गेलेले आमचे विचार ही बंधने ओलांडून त्यापलीकडच्या अधिक विस्तृत सहकार्याकडे वळू लागले. विशेषत: आमच्या देशाच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील शेजारी, चीन, अफगाणिस्तान, इराण, सोव्हिएट युनियन, यांच्याशी आमचे संबंध घनिष्ठ करावेत असे आम्हाला वाटे. दूरवरच्या अमेरिकेशी तर अगदी ह्याहीपेक्षा जवळचे स्नेहसंबंध असावेत असे आम्हाला वाटे, कारण सोव्हिएट युनियनप्रमाणेच अमेरिकेजवळून आम्ही पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. इंग्लंडकडून आणखी काही शिक्षण मिळविण्याजोगी आमची ग्रहणशक्ती राहिली नाही अशी आमची भावना झाली होती, व काहीही झाले तरी ज्या अपायकारक बंधनाने आमचा देश इंग्लंडला बांधला गेला होता ते बंधन तोडून बरोबरीच्या नात्याने आम्ही एकमेकांना भेटू लागलो तरच या परस्पर संबंधापासून आमच्या देशाचे थोडेफार बरे होण्याचा संभव आहे असे आम्हाला वाटे.
ब्रिटिश डोनिनियनचा दर्जा असलेले काही देश व ब्रिटिश वसाहती यांत जो वर्णभेद दाखविण्यात येई, व हिंदी लोकांना ज्या रीतीने तेथे वागणूक मिळे त्यामुळेच आम्हाला या ब्रिटिश साम्राज्यसमूहातून फुटून निघण्याची उत्कटता वाटू लागली. दक्षिण आफ्रिका व खुद्द ब्रिटिश वसाहत कचेरीच्या अधिकारात असलेले पूर्व आफ्रिका व केनिया हे प्रदेश म्हणजे वर्णभेद व वाईट वागणूक या दोषांमुळे सतत हिंदुस्थानचा क्षोभ वाढविणारे देश होऊन बसले होते. त्यात एक मौज अशी की, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड येथील नागरिकांचे व हिंदी लोकांचे व्यक्तिश: एकमेकांशी चांगले जमून जाई. कारण हे नागरिक एका नव्या परंपरेचे प्रतिनिधी होते व ब्रिटिशांच्या अंगी मुरलेले पुष्कळसे पूर्वग्रह व ब्रिटिशांचा सामाजिक व्यवहारातला संकोच यांची त्यांना बाधा झालेली नव्हती.