मुलांच्या शिक्षण क्रमात कोठल्यातरी कलाकौशल्याचा, हस्तव्यवसायाचा संबंध आणणे इष्ट आहे हे तत्त्व आता सर्वमान्य झाले आहे. असा काही संबंध आला म्हणजे बुध्दीला चालना मिळून डोक्यातले विचार व हातातले काम यांची नीट सांगड घातली जाते. हाच प्रकार यंत्रांच्या बाबतीतही होऊन, वाढत्या वयाच्या मुलामुलींची जिज्ञासा यंत्रामुळे जागी होते. त्यांच्या बुध्दीला चेतना मिळते. पोटाकरता निरुपायाने एखाद्या कारखान्यात काम करीत असताना त्या प्रतिकूल वातावरणात नव्हे, तर योग्य त्या प्रसन्न वातावरणात मुलामुलींची बुध्दी त्यांचा यंत्राशी संबंध आला म्हणजे वाढत राहते व त्यांच्या दृष्टीसमोर नवीनवी क्षितिजे येऊ लागतात. विज्ञानशास्त्रातले साधे प्रयोग, सूक्ष्मदर्शक यंत्रातून अधूनमधून निरीक्षण, निसर्गातील सामान्य दृश्ये व घटना कशा रीतीने घडतात ते समजावून सांगणे, असे चाललेले असले म्हणजे त्याबरोबर मनाची उत्कंठा वाढत जाते, सृष्टीत ज्या काही घडामोडींचा अर्थ कळू लागतो व ठराविक शब्दांच्या धड्यावर, ठराविक रीतीवर विसंबून न बसता आपण स्वत: काही प्रयोग करून काही नवे करून पाहावे अशी इच्छा विद्यार्थ्याला होत होते. विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत जातो व एकमेकांचे साहाय्य घेऊन काही कार्य करण्याची वृत्ती बळावते व भूतकालाच्या कुन्द रोगट वातावरणामुळे आलेली अगतिकता कमी होते. नवनवे प्रकार निघून सारखी सुधारणा होत असलेल्या यंत्राच्या तंत्रविद्येवर आधारलेली संस्कृती प्रचारात असली म्हणजे त्यामुळे आपोआप हे सारे घडू लागले. अशी संस्कृती म्हणजे एक फार मोठा फरक होतो, जुन्यातून नव्यात हळूहळू चालत न जाता एकदम उडी मारून नव्या जमान्यात गेल्यासारखे होते, व या नव्या संस्कृतीचा नव्या यांत्रिक युगाशी फार निकट संबंध आहे. त्यामुळे नव्या अडचणी, नवे प्रश्न निघतात, पण त्याबरोबर या अडचणीतून वाटा व या प्रश्नांची उत्तरेही सापडतात.
शिक्षणातील वाङ्मयाचा भाग मला विशेष प्रिय आहे व मला प्राचीन भाषांचे विशेष कौतुक आहे. परंतु मुलामुलींच्या शिक्षणात पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र व विशेषत: जीवशास्त्र या सार्या शास्त्रांचा थोडाफार तरी प्राथमिक अभ्यास अवश्य असला पाहिजे असे माझे निश्चित मत आहे. तसा अभ्यास झाला तरच त्यांना आधुनिक जगाचे काही ज्ञान होऊन त्यात त्यांचा जम बसेल व निदान काही अंशाने तरी त्यांच्यात शास्त्रीय वृत्तीची वाढ होईल. विज्ञानशास्त्राच्या व आधुनिक यंत्रविद्येच्या बळावर मनुष्यजातीचा ज्या मोठमोठ्या गोष्टी साधता आल्या आहेत आणि (त्याहीपेक्षा अधिक गोष्टी लवकरच साधता येतील हे नक्की) शास्त्रीय उपकरणे, यंत्रे यातून जे काही अप्रतिम चातुर्य दिसून आले आहे, शक्ती पाहिजे असेल तर वाटेल तेवढी प्रचंड शक्ती पुरविणारी परंतु अणुरेणूंचेही मान दाखविणारी यंत्रे निघाली आहेत. साहसाने चालवलेले प्रयोग व त्यातून निघालेल्या सिध्दान्तांचा उपयोग यामुळे हल्लीच्या काळातले अनंत प्रकार साध्य झाले आहेत. भोवतालच्या निसर्गसृष्टीत चाललेल्या घडामोडी व क्रियाप्रक्रिया यांतील काही ओझरती दृश्ये पाहता येत आहेत, विविध शास्त्रांतून असंख्य कार्यकर्त्यांच्या हातून कल्पना, व प्रत्यक्ष कृती यांचा भव्य मांडलेला आहे, हे सारे पाहून आणि हे सर्व काही मानवी बृध्दीने साध्य केले आहे हे विशेषत: लक्षात आले म्हणजे काही वेगळेच आश्चर्य वाटू लागते.