मराठी राज्यावर राष्ट्रभक्ती आणि एक प्रकारचा एकजिनसीपणा ज्यांच्या अंगी होता ते मराठेही जेथे मुलकी आणि लष्करी संघटनेत मागासलेले ठरले तेथे इतरांची स्थिती तर कितीतरी कमी प्रतीची होती.  रजपूत मोठे शूर असले तरी त्यांचे राज्य सरंजामशाही पध्दतीचे व ते मोठे काव्यमय धीरोदात्त असले तरी अगदी निरुपयोगी होते.  शिवाय आपसातल्या कुलपरंपरागत गतवैरामुळे त्यांचे आपसात कोणाशी धड नव्हते.  सरंजामशाही पध्दतीतील प्रभुनिष्ठेमुळे आणि अकबराच्या पूर्वीच्या धोरणाचा परिणाम म्हणून हे रजपूत पुष्कळदा अस्तास जाणार्‍या दिल्लीच्या सत्तेची बाजू घेत.  परंतु त्यांच्या मदतीचा उपयोग करून घेण्याइतपत दिल्ली प्रबळ नव्हती.  हळूहळू रजपुतांचा अध:पात झाला; दुसर्‍यांच्या हातातील ते खेळणी बनून शेवटी शिंद्यांच्या कक्षेत ओढले गेले.  स्वत:चे रक्षण करून घेण्यासाठी त्यांच्यातल्या काही राजांनी काळजीपूर्वक दोन्हीकडे संधान संभाळण्याचा प्रयत्न करून पाहिला.  रजपुतांप्रमाणे उत्तर व मध्य हिंदुस्थानातील अनेक मुसलमान राजेरजवाडे, अमीरउमराव मागासलेले होते, जुन्यापुराण्या सरंजामशाही दृष्टीचे होते.  त्यांच्यामुळे देशाच्या भवितव्यावर काहीही परिणाम होण्यासारखा नव्हता.  लोकांची दुर्दशा अधिकच वाढवायला, गोंधळ अधिक करायला मात्र ते कारणीभूत होत.  त्यांच्यातील काहींनी मराठी अधिसत्ता मान्य केली होती.

नेपाळचे गुरखे खरोखर बहाद्दर होते.  ते शिस्तीचे उत्कृष्ट सैनिक होते.  ते ईस्ट इंडिया कंपनीच्या उत्तमोत्तम फौजेच्या वरचढ नसले तरी तोडीचे होते.  त्यांची दृष्टीही जरी संपूर्णता सरंजामशाही होती, तर स्वत:च्या मातृभूमीबद्दल त्यांना अपार प्रेम होते, आणि स्वत:च्या भूमीच्या बचावासाठी ते लढू लागले म्हणजे दुर्दम्य ठरत.  ब्रिटिशांशी त्यांनीही लढत दिली व क्षणभर त्यांची भीतीही ब्रिटिशांना वाटली.  परंतु हिंदुस्थानच्या मुख्य लढायांचा प्रश्न त्यामुळे सुटला नाही.

मराठे उत्तर व मध्य हिंदुस्थानभर सर्वत्र पसरले होते.  परंतु तेथे त्यांनी स्वत:ची शक्ती, सत्ता, दृढमूल केली नाही.  ते येत आणि जात, त्यांनी मूळ कोठेच धरले नाही.  युध्दाचे रागरंग घडीघडीला बदलत असल्यामुळे कोठेही मूळ धरणे कठीणच होते.  तसे पाहिले तर ब्रिटिशांच्याही सत्तेखाली आलेल्या किंवा त्यांची सत्ता मान्य करणार्‍या प्रदेशात त्यापेक्षाही वाईट स्थिती होती.  ब्रिटिशांनी किंवा त्यांच्या कारभाराने तेथे मूळ धरले होते असे नाही.

मराठ्यांचे (व अर्थातच त्या मानाने अधिकच असे इतर हिंदी राज्यकर्त्यांचे) राज्यसत्ता मिळविण्याचे उपाय हौशीखातर एखादे काम करणार्‍या, करून पाहू म्हणून बेहिशेबी साहस करण्याच्या वृत्तीचे होते, तर त्याच्या उलट ब्रिटिश पक्के हिशेबी, धंदा म्हणून काम करण्याच्या वृत्तीचे होते.  पुष्कळदा ब्रिटिश पुढारी स्वत: मोठे धाडसी होते, परंतु धोरणाच्या दृष्टीने असे साहस त्यांनी कधीच केले नाही.  धोरणासाठी आपापल्या नियुक्त क्षेत्रात सारे काम करीत.  एडवर्ड थॉम्प्सन लिहितो, ''हिंदी राजेरजवाड्यांकडे ईस्ट इंडिया कंपनीचे काम करणारे जे मुत्सद्दी, कारभारी असत, त्यांच्या तोलाचे व लायकीचे लोक ब्रिटिश साम्राज्यात एकाच वेळी कधीही दिसून येणार नाहीत.''  हिंदी राजांच्या दरबारातील प्रधानांना आणि इतर अधिकार्‍यांना लाच चारून त्यांना फंदफितुरी करायला लावणे, त्यांना भ्रष्ट करणे हे या ब्रिटिश रेसिडेंटाचे पहिले काम असे.  एक इतिहासकार म्हणतो, ''त्यांची हेरपध्दती पक्की होती.''  हिंदी राजेरजवाड्यांच्या दरबारातील इत्थंभूत बातमी त्यांना असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel