आमचा विवाह नि नंतर

आमच्या लग्नानंतरची ती पहिली वर्षे माझ्या डोळ्यांसमोर येत.  मला ती खूप आवडे तरी मी तिला विसरून जात असे.  सहचारिणी म्हणून माझ्या जीवनात वावरण्याचा तिचा हक्क मी कैक रीतीने बजावू दिला नाही.  कारण त्या वेळी मी भारल्यासारखा झालो होतो.  जे कार्य मी हाती घेतले होते त्या कार्याशी मी एकरूप झालो होतो, इतर सारे विसरून गेलो होतो.  मी माझ्या स्वप्नसृष्टीत गुंग होतो.  माझ्या भोवतालच्या चालत्याबोलत्या माणसांकडे स्वप्नमय छाया म्हणून मी बघत होतो.  ज्या कार्याने मला भारले होते, त्या कार्याने माझे मनही व्यापले हाते.  माझी सारी उत्साहशक्ती त्या कार्याला मी दिली होती आणि इतरत्र द्यायला शिल्लक उरतच नसे.

इतके असूनही मी तिला विसरणे शक्य का होते ?  मी पुन्हा पुन्हा तिच्याकडे येत असे.  तारु बंदरात यावे त्याप्रमाणे मी तिच्याजवळ आश्चयार्थ येत असे.  मी कित्येक दिवस दूर राहात असलो तरी तिचा नुसता विचारही माझ्या मनाला गारवा आणी.  आणि घरी कधी जाता येईल त्याची मी उत्सुकतेने वाट बघत असे.  मला सुखसमाधान द्यायला, मला सामर्थ्य द्यायला कमला नसती तर खरोखर मी काय केले असते ?  शरीराची नि मनाची रिती झालेली माझी बॅटरी पुन्हा भरून द्यायला जर कमला नसती तर ?  तिच्यामुळेच मी माझी विद्युतशक्ती पुन्हा पुन्हा मिळवून घेत असे.

तिने मला जे दिले ते मी घेतले होते.  परंतु त्या आरंभीच्या वर्षात तिला मी काय दिले होते, कोणता मोबदला दिला होता ?  खरोखरच या बाबतीत मी अपराधी आहे आणि त्या दिवसांतील त्या गोष्टीचा परिणाम कमलाच्या मनावर खोल झाला असला पाहिजे.  ती फार मानी होती व मनाला फार लावून घेई.  माझ्याजवळ आपण होऊन मदत मागायला ती तयार नव्हती.  वास्तविक इतर कोणाहीपेक्षा मीच तिला जी मदत हवी होती, जे मार्गदर्शन हवे होते ते अधिक चांगल्या रीतीने करू शकलो असतो.  राष्ट्रीय लढ्यात आपणही योग्य तो भाग घ्यावा असे तिला वाटत होते.  केवळ पतीवर विसंबून राहणारी, त्याची सावली, नुसती पडछाया होऊन राहणे तिला पसंत नव्हते.  जगाला व स्वत:ला ती स्वत:ची स्वतंत्रपणे योग्यता दाखवू इच्छीत होती.  स्वत:च्या अस्तित्वाला अर्थ आहे ही गोष्ट ती सिध्द करू पाहात होती.  याहून या जगात मला तरी आणखी कशाने आनंद झाला असता ?  परंतु मी फार गढून गेलो होतो.  खाली खोल बघायला मला वेळ नव्हता.  कमला कशाची उत्सुकतेने तीव्रतेने वाट बघत आहे, अपेक्षा करीत आहे इकडे मी लक्ष दिले नाही, आणि नंतर ते पुन्हा पुन्हा माझे तुरुंगात जाणे सुरू असे, त्यामुळे मी तिच्यापासून दूर असे; किंवा ती आजारी असे.  रवींद्रनाथांच्या नाटकातील चित्राप्रमाणे कमलाही जणू मला म्हणत असेल : ''मी चित्रा आहे.  जिची पूजा करावी अशी मी एखादी देवता नाही.  दिव्यावर होरपळलेल्या पतंगाची कीव वाटूनही शेवटी त्याला सहज झटकून टाकतात तशी उपेक्षणीय कीटकही नाही.  संकटाच्या नि साहसाच्या मार्गात स्वत:च्या शेजारी मला उभे राहू देण्याची जर कृपा केली, तुमच्या जीवनातील थोर महनीय कर्तव्यात मलाही भाग घेण्याची परवानगी दिली, तर माझे खरे स्वरूप तुम्हाला समजून येईल.''  परंतु कमला अशा प्रकारे प्रत्यक्ष शब्दांनी माझ्याजवळ कधी बोलली नाही.  पुढे हळूहळू तिच्या डोळ्यांतला संदेश मी वाचला.

१९३० सालच्या आरंभीच्या काळात तिच्या या आशाआकांक्षांची मला प्रथम कल्पना आली.  आम्ही एकत्र काम केले.  त्या नव्या अनुभवात एक नवीन आनंद मला लाभला.  काही काळ जीवनाच्या कड्यावर आम्ही दोघे उभी होतो.  वादळी मेघ जमा होऊ लागले, राष्ट्रीय प्रक्षोभाची वेळ जवळ येत होती.  ते महिने किती आनंदात परंतु किती पटकन निघून गेले, आणि एप्रिल आला.  सनदशीर कायदेभंगाचा वणवा पेटला.  सरकारी वरवंटा फिरू लागला.  मी पुन्हा तुरुंगात पडलो.

आम्ही पुरुषमंडळी बहुतेक तुरुंगात गेलो.  आणि एक नवल वर्तले— चमत्कार घडला.  आमचा स्त्रीवर्ग आता पुढे सरसावला.  त्यांनी लढ्याचा भार उचलला.  स्त्रिया आतापर्यंत लढ्यात नव्हत्या असे नाही.  परंतु या वेळी बर्फाचा कडा कोसळून गर्जत, आड आलेल्याचा चक्काचूर करीत यावा तशा असंख्य स्त्रिया पुढे आल्या.  ब्रिटिश सरकारच चकित झाले असे नाही, तर आम्हीसुध्दा चकित झालो.  ज्या वरच्या वर्गातील, मध्यम वर्गातील स्त्रिया आजपर्यंत घरातील शीतल छायेत असत, त्या बाहेर आल्या.  तसेच शेतकरी नि कामगार बायाही आल्या.  श्रीमंत वा गरीब प्रश्न राहिला नाही.  सरकारी हुकूम व पोलिसची लाठी धुडकावून देऊन हजारोच्या हजारो स्त्रिया पूर आल्यासारख्या लोटत होत्या.  स्त्रियांनी शौर्य, धैर्य, साहस, निर्भयता याच गोष्टी केवळ दाखविल्या असे नाही; तर आश्चर्य हे की त्यांनी दाखविलेले संघटनासामर्थ्यही अप्रतिम होते.

आम्ही त्या वेळेस नैनी तुरुंगात होतो.  ती वार्ता जेव्हा आमच्या कानावर आली त्या वेळेचा आमचा आनंद विसरणार नाही.  शरीरभर आनंदाच्या लहरी उठत.  अभिमान वाटून आम्हाला असे भरून आले की, डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले व एकमेकांत बोलायला शब्द फुटेना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel