''नैतिक मूल्ये साधण्याकरिता सत्ता मिळवावयाची नसते, सत्ता मिळविणे सुलभ व्हावे एवढ्याकरिता साधने म्हणून ह्या गुणांचा उपयोग करावयाचा असतो.''*
-------------------------------------------
* America's Strategy in World Politics (जागतिक राजकारणात अमेरिकेची शक्तियोजना.)

अमेरिकेतले लोकमत सर्वस्वी असेच असेल असे नाही, पण त्या लोकमतापैकी एका वजनदार गटाचे हे विचार आहेत हे निश्चित.  आपल्या कक्षेत अनेक देश सामावून घेऊन आपल्या विस्ताराने पृथ्वीचा सारा घेर व्यापून बसणारी वेगवेगळी तीन किंवा चार राष्ट्रमंडले-अटलांटिक महासागराच्या भोवती पसरलेल्या देशांचे एक मंडळ, रशियाचे एक मंडळ, चीनचे एक मंडल, व त्यानंतर दक्षिण आशियातील देशांचे एक हिंदु-मुस्लिम मंडल-असावी अशी एक दिव्य कल्पना मि. वॉल्टर लिपमन यांना सुचली आहे.  तिचा अर्थ एवढाच की, सत्तास्पर्धेचे राजकारण आजपर्यंत चालत आले तसेच, पण त्याहीपेक्षा विशाल प्रमाणावर चालायचे.  पण मग त्यातून पुढे भविष्यकालात जागतिक शांतता किंवा जागतिक सहकार्य यथाक्रम उद्‍भवण्याची शक्यता त्यांना वाटते तरी कशी, ते काही समजत नाही.  अमेरिकन लोकांच्या स्वभावात जिला व्यवहारी यथार्थता दृष्टी म्हणतात ती वृत्ती, आणि काही अस्पष्टसा ध्येयवाद व मानवता-प्रेम यांचे विचित्र मिश्रण झालेले आढळते.  यांपैकी कोणती वृत्ती वरचढ होऊन तिचा प्रभाव भविष्यकाळावर पडेल? किंवा कोणती एखादीच वृत्ती वरचढ न होता त्यांचे प्रमाण कमी-अधिक काय ते राहिले, तर या मिश्रणाचा परिणाम काय होईल?  बहुसंख्य सर्वसामान्य जनतेचे विचार काहीही चालोत, अखेर प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राचे परस्पराष्ट्रीय धोरण, ते संभाळण्याची कामगिरी चालविणार्‍या काही निवडक तज्ज्ञांच्या हातीच अव्याहत राहते, आणि जुन्या परंपरा तशाच्या तशा पुढे चालविण्याच्या तत्त्वाशीच त्यांची जन्माची गाठ बहुधा पडलेली असल्यामुळे, काही नवा उपक्रम करू म्हटले तर त्यातून आपल्या राष्ट्राच्या मागे काही नव्याच कटकटी लागतील. नवा धोका उभा राहील अशी भीती त्यांना वाटत असते.  राष्ट्राची धुरा ज्यांनी वाहावयाची त्यांच्या अंगी यथार्थतादृष्टी अर्थातच अवश्य आहे, कारण नुसत्या कोरड्या सहानुभूतीच्या आधारावर किंवा केवळ कल्पनेच्या भरार्‍यांवर कोणत्याही राष्ट्राला आपले अंतर्गत किंवा परराष्ट्रीय राजकारणाचे धोरण ठरवता येत नाही.  पण आज डोळ्यांसमोर धडधडीत दिसणार्‍या सत्य घटना, व त्या नुसत्या आर्थिक किंवा आर्थिक नसून त्यांत कोट्यवधी लोकांच्या भावना व प्रेरणा यांचाही समावेश होतो ही वसतुस्थिती, लक्षात न घेता किंवा लक्षात आली तरी समजून न घेता जुन्या गतकालीन स्थितीच्या निष्प्राण सांगाड्याला कवटाळून बसण्याची ही या राष्ट्रधुरीणांची वृत्ती म्हणजे यथार्थता दृष्टीचा एक अजब नमुनाच म्हटला पाहिजे.  वर्तमानकाळातल्या व भविष्यकाळी निघणार्‍या प्रश्नांचा विचार करताना, त्यासंबंधी अनेकांचे विचार नुसते ध्येयवादी आहेत असे म्हटले जाते, पण या ध्येयवादी विचारांचा त्या अडचणींशी अन्वय लागतो तितकासुध्दा संबंध या असल्या यथार्थता दृष्टीचा वस्तुस्थितीशी नसतो, उलट ही यथार्थता दृष्टीच कोठल्यातरी केवळ कल्पनारम्य जगात रमलेली दिसते.

भूरचनानुवर्ती राजकारणशास्त्र नावाचे एक शास्त्र आजकाल स्वत:ला वास्तववादी म्हणविणार्‍या मंडळींची विचारनौका इच्छित स्थळी पक्की बांधून ठेवण्याचे साधन बनलेले आहे.  त्या शास्त्रातील 'मध्यस्थित हृदयप्रदेश', 'सीमास्थित कटिप्रदेश' असल्या पारिभाषिक शब्दांच्या अवडंबरातून राष्ट्रांच्या अभ्युदय-विनाशाच्या गुढावर प्रकाश पडतो अशी समजून प्रचलित आहे.  या शास्त्राचा उगम इंग्लंडमध्ये (का स्कॉटलंडमध्ये?) झाला व ते शास्त्र त्यानंतर पुढे नाझी पक्षाची मार्गदर्शक प्रकाशज्योती बनले, त्या पक्षाची आशास्वप्ने, जगज्जेते होण्याची त्यांचे महत्त्वाकांक्षी बेत या शास्त्रानेच पोसून वाढवले, आणि या शास्त्राच्या पायी अखेर सर्वनाश ओढवला.  अर्धवट सत्य हे केव्हा केव्हा असत्यापेक्षाही अधिक भयंकर ठरते.  कोणे एके काही तेवढ्यापुरत्या खर्‍या असलेल्या परंतु आता तशा नसलेल्या तत्त्वांच्या नादी लागले तर आजची आताची वस्तुस्थिती माणसाला पार दिसेनाशी होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel