बुध्दांनी प्रत्यक्ष चातुरर्वर्ण्यावर जातिभेदावर हल्ला चढविला नाही.  परंतु त्यांच्या संप्रदायात त्यांच्या संघात जातिभेदाला, वर्णभेदाला थारा नव्हता.  त्यांची एकंदर चळवळ, त्यांचे विचार यामुळे वर्णव्यवस्था खिळखिळी झाली यात शंका नाही.  त्यांच्या काळात हे वर्णभेद जातिभेद तितके कडक झाले नसावेत, व पुढेही काही शतके जात प्रवाहासारखी पातळ, दुसर्‍या जातीत सहज मिसळण्यासारखी राहिली.  जो समाज जातिभेद, वर्णभेद यांच्या ओझ्याखाली दडपलेला असेल तो परदेशांशी व्यापार किंवा इतर अन्य साहसे सहजासहजी करू शकणार नाही, हे उघड दिसते.  परंतु बुध्दाच्या नंतर जवळजवळ पंधराशे वर्षे अधिकच हिंदुस्थान आणि शेजारचे देश यांच्यामध्ये व्यापार भरभराटीत चालला होता व याच काळात परद्वीपात हिंदी वसाहतीही फोफावून भरभराटत होत्या.  वायव्येकडून विदेशीयांच्या लाटा सारख्या धडकत होत्या आणि हिंदुस्थानातील जनतासागरात विलीन होत होत्या.

हे समावेश करून घेण्याचे धोरण वरून-खालून दोन्ही टोकांनी चालू असे.  तो मोठा मनोरंजक इतिहास आहे.  खाली तळाशी नवीन नवीन जाती निर्माण केल्या जात, आणि परदेशातून येणार्‍यांपैकी जे विजयी होत त्यांचे सत्ताधारी वर्गात, क्षत्रियांत रूपांतर करून त्यांना मिसळून घेण्यात येई.  ख्रिस्त सनाच्या पूर्वी आणि नंतर दोन-तीन पिढ्यांच्या काळात हा असा झपाट्याने बदल होत होता असे तत्कालीन नाण्यांवरून दिसते.  एखादा पहिला राजा परकी नाव धारण करणारा दिसतो. परंतु त्याचा मुलगा किंवा नातू संस्कृत नावाचा दिसतो; आणि परंपरागत विधीने त्याला क्षत्रियोचित असा राज्याभिषेक होतो.

पुष्कळ रजपूत क्षत्रिय घराणी शक किंवा सीथियन यांच्या स्वार्‍यांच्या वेळची आहेत.  या स्वार्‍या ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात साधारणपणे सुरू झाल्या.  काही रजपूत घराणी नंतरच्या श्वेत हूण लोकांच्या स्वार्‍यांच्या वेळचीही असावीत.  या सर्वांनी या देशाचे परंपरागत धर्म व संस्था यांचा स्वीकार केला, आणि रामायण-महाभारतातील विख्यात पुरुषांशी ते आपले संबंध जोडू लागले.  अशा रीतीने क्षत्रियवर्णी लोक जन्मावर अवलंबून न राहता, माणसाचा दर्जा, त्याचा पेशा पाहात होते असे दिसते आणि त्यामुळे परकीयांचा त्यांच्यात समावेश करणे सोपे होते.

भारतीय इतिहासाच्या प्रदीर्घ काळात थोर पुरुषांनी उपाध्येगिरी व जातिभेदाच्या कडकपणाविरुध्द सावध राहण्याचा इशारा पुन्हा पुन्हा वेळोवेळी दिला आहे व प्रचंड चळवळीही त्यासाठी झालेल्या आहेत.  परंतु कपाळी आलेल्या अटळ नशिबासारखा हा जातिभेदाचा कर्मभोग वाढत वाढत जिकडे तिकडे पसरला आहे व हिंदू जीवनाच्या सर्व अंगांना त्याची मगरमिठी पडली आहे.  जातिभेदाविरुध्द बंड करणार्‍यांना असंख्य अनुयायीही मिळाले; परंतु काही काळाने त्यांचीच एक आणखी स्वतंत्र जात होई.  जैन धर्म, वास्तविक मूळचा तो वैदिक धर्म त्याच्याविरुध्द बंड करुन निघाला.  अनेक प्रकारे तो अगदी भिन्न आहे.  जैन धर्मातही भेद सुरू राहिला व त्या धर्माची व्यवस्था जातिभेदाला धरून झाली.  अशामुळे हिंदू धर्माची एक फांदी इतक्याच स्वरूपात तो आज हिंदुस्थानात जीव धरून राहिलेला दिसतो.  बौध्द धर्म अशी तडजोड करायला तयार नसल्यामुळे आपली तत्त्वे आणि दृष्टिकोण अधिक स्वतंत्र राखू पाहात होता म्हणून येथून तो धर्म निघून गेला.  परंतु या देशावर व हिंदू धर्मावर त्याचा खोल ठसा उमटलेला आहे.  अठराशे वर्षांपूर्वी येथे ख्रिस्ती धर्म येऊन त्याचा जम बसल्यावर हळूहळू त्याच धर्मात जाती उत्पन्न झाल्या.  मुसलमानी धर्मात अशा सर्व भेदांचा धिक्कार केला असूनही हिंदी मुसलमान समाजातही थोडाफार जातिभेद आहेच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel