अशा रीतीने राज्यकारभारातील दुय्यम जागा हिंदी लोकांना देण्याचा प्रघात सुरू झाला पण खरी सत्ता, सारे धोरण इंग्रज अधिकार्यांच्याच हाती असे. इंग्रजी शिक्षण जसजसे वाढू लागले, तसतशी लोकांची नोकरीचाकरीतील मिरासदारी कमी होऊ लागली व राज्यकारभाराच्या मुलकी, त्याचप्रमाणे न्यायदान खात्यातही इतर प्रांतांतील हिंदी लोकही शिरू लागले. नोकर्याचाकर्यांचे हे हिंदीकरण ब्रिटिश सत्ता दृढमूल करण्याचे अतिप्रभावी व परिणामकारक साधन ठरले. हिंदुस्थानला ताब्यात ठेवण्यासाठी सज्ज असलेल्या खड्या सैन्याहूनही ही दिवाणी मुलकी नोकराचाकरांची ठायीठायी उभी असलेली फौज अधिक परिणामकारक व महत्त्वाची होती. या सनदी नोकरांच्या फौजेत काही व्यक्ती कर्तबगार, देशाभिमानी, राष्ट्रीय वृत्तीच्या असत. परंतु व्यक्ती या नात्याने सैनिकही देशाभिमानी असला तरी त्याचा तो लष्करी कायदा, ती शिस्त आड येते, आणि हुकूम पाळला नाही, बंड केले, सरकारी बाजू सोडली तर शिक्षाही जबर असते. तद्वतच याही लोकांचे होते. सनदी नोकरांची ही फौज उभी करण्यात आली एवढेच नव्हे, तर आपल्याला नोकरीचाकरी मिळेल, तेथे बढती मिळेल या आशेने असंख्य लोकांच्या मनावर परिणाम होऊ लागला. शिवाय ही संख्या फुगतच राहिली व या इतक्या मोठ्या संख्येची निष्ठाही वाईट होऊ लागली. नोकरीचाकरीत एक प्रकारची प्रतिष्ठा वाटे, सुरक्षितता वाटे, आणि नोकरीच्या अखेरीस पेन्शन होते, वरिष्ठ अधिकार्यांची हांजीहांजी केली तर इतर कितीही दोष असले तरी सारे धकून जाई. दुय्यम नोकर्याचाकर्या करणारे हे लोक असत. त्यांच्यामार्फत सत्ताधारी ब्रिटिश आणि जनता यांच्यामधले व्यवहार चालत असत. या नोकरांना वरिष्ठांपुढे जरी नाक घासावे लागले तरी हे आपल्या हाताखालच्यांशी आणि एकंदर जनतेशीही उर्मटपणा करून करडा अंमल गाजवीत.
अन्यत्र नोकरीचाकरी नसल्यामुळे, पोट भरायला दुसरी साधने नसल्यामुळे सरकारी नोकरीलाच अधिकाधिक महत्त्व प्राप्त झाले. फार थोड्यांना वकील किंवा डॉक्टर होणे शक्य होते. त्यांचे चांगले चालेलच अशी काही खात्री नव्हती. माल तयार करण्याच्या कारखान्यांचा, गिरण्यांचा धंदा अस्तित्वात नव्हता म्हटले तरी चालेल. वंशपरंपरागत वर्गाच्या हाती व्यापार होता, त्यात त्यांचा जम सहज बसून जाई, आणि एकमेकांस ते आधार देऊन मदत करीत. नवीन शिक्षणाने व्यापारधंदा किंवा उद्योग यात शिरण्याची पात्रता येत नसे; कारण सरकारी नोकरी हेच या शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट होते. शिक्षणाचे क्षेत्रच इतके मर्यादित होते की, विद्या शिकून करण्यासारखे वकिली, डॉक्टरकी, अध्यापन वगैरे व्यवसाय फार थोडे होते. समाजोपयोगी इतर काही संभावित नोकरीधंद्याचे प्रकार नव्हतेच म्हटले तरी चालेल. तेव्हा राहता राहिली सरकारी नोकरी. जेव्हा कॉलेजे वाढू लागली व पदवीधर भराभरा बाहेर पडू लागले, आणि सरकारी नोकरीत सर्वांचाच अंतर्भाव करता येईनासा झाला तेव्हा भयंकर स्पर्धा सुरू झाली. बेकार पदवीधर आणि इतर यांचा एक साठा बनला, त्यातून जरुरीप्रमाणे सरकार निवडून घेई. ज्यांना नोकरी होती त्यांच्या नोकरीच्या शाश्वतीला ह्या बेकारांचा एक धोका असे. या एकंदर प्रकारामुळे नोकर ठेवणारा सर्वांत मोठा मालक म्हणजे सरकार अशी अवस्था आली, एवढेच नव्हे, तर सरकारी रेल्वे खाते धरून हिशेब केला तर सर्वांत जास्त नोकरवर्ग सरकारीच झाला. अशा रीतीने एक देशव्यापी, प्रचंड नोकरशाहीचे तंत्र उभारले गेले. या तंत्रावर सर्व हुकमत फक्त वरच्या वरिष्ठांची असे. देशावरील ताबा दृढ करण्यासाठी म्हणून ही प्रचंड नोकरशाही-नोकरी देण्याचे हे औदार्य दाखविण्यात आले होते. सरकारशी ज्यांचे जमत नसेल किंवा जे सरकारचे नावडते असतील त्या वर्गांना दडपण्यासाठी, सरकारी नोकरी मिळावी म्हणून ताटकळत बसणार्या विविध जाति-जमातींत स्पर्धा व भेद माजवित म्हणून ही नोकरशाहीची प्रथा सरकारने सुरू केली होती. या प्रथेमुळे सद्गुणांचा र्हास होऊन अधोगती आली, स्पर्धा वाढली आणि सरकारला त्याच्याविरुध्द तो वर्ग, त्याच्याविरुध्द हा वर्ग असे करता येऊ लागले.