सर्व पक्षांना समाधान होईल अशा रीतीने जातीय प्रश्न सोडविण्यात आम्हांला यश आले नाही; आणि या अपयशाचे परिणाम आम्हालाच भोगावे लागणार असल्यामुळे या दोषाचे वाटेकरीही नि:संशय आम्ही आहोत. परंतु एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत, एखाद्या फरकाच्या बाबतीत सार्यांचेच समाधान कधीकाळी तरी कोणाला करणे शक्य आहे का ? काही सरंजामशाही आणि प्रतिगामी गटांना कोणताच फरक नको असतो; तर दुसरे असे असणार की, त्यांना राजकीय, आर्थिक सामाजिक सर्वच बाबतींत क्रांती हवी असते. या दोन टोकांमध्ये आणखी पुष्कळ तर-तमवाले पक्षोपपक्ष असतात. एखाद्या लहान घटकाला ''बस्स, नाही'' असे म्हणून जर बदल अडकवून ठेवता येऊ लागला तर प्रगतीची आशाच संपली. सत्ताधारी वर्ग जेव्हा असे अत्यंत लहान लहान पक्षोपपक्ष उभे करून प्रगतीच्या आड यायला त्यांना उत्तेजन देत असतो, त्या वेळेस यशस्वी क्रांतीखेरीज बदल होणे केवळ अशक्य असते. हिंदुस्थानात ब्रिटिशांनी निर्माण केलेले आणि काही मूळचेच असे अनेक प्रतिगामी, सरंजामशाही वृत्तीचे गट आहेत. त्यांची संख्या कमी असेल, परंतु ब्रिटिश सत्तेचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असतो.
मुसलमानांत मुस्लिम लीगशिवाय विविध संघटना वाढल्या. त्यांतील जुन्या आणि महत्त्वाच्या संघटनांपैकी 'जमायत-उल्-उलेमा' ही एक होती. सर्व हिंदुस्थानातील जुन्या परंपरेचे मुसिलम धर्मपंडित, मुल्ला, मौलवी या संघटनेत होते. ही संस्था परंपरा पूजिणारी, एकंदरीत सनातनी वृत्तीची, विशेषेकरून धर्ममय अशी असूनही, राजकीय दृष्ट्या प्रगत आणि साम्राज्यविरोधी अशी होती. राजकीय भूमिकेवरून राष्ट्रसभेशी तिने अनेकदा सहकार्य केले आहे. तिचे पुष्कळसे सभासद राष्ट्रसभेचेही सभासद असत आणि राष्ट्रसभेच्या द्वारा कामही करीत. दुसरी एक मुस्लिम संघटना म्हणजे अहरारांची. ही बर्याच उशिराने स्थापण्यात आली होती आणि पंजाबात ती अती बलवान होती. मुसलमान समाजातील जरा खालच्या मध्यमवर्गाची ही संस्था होती. आणि विशिष्ट टापूत बहुजनसमाजावर या संस्थेचे चांगले वजन होते. मुसलमानांतील अत्यंत मागासलेला आणि दरिद्री वर्ग म्हणजे मोमिनांचा. मोमीन म्हणजे विशेषेकरून विणकर वर्ग. त्यांची संख्या खूप आहे. परंतु ते दुबळे आहेत, नीटसे संघटित नाहीत. राष्ट्रसभेविषयी त्यांना ओढा असे आणि मुस्लिम लीगला ते विरोध करीत. दुबळे आणि असंघटित असल्यामुळे ते राजकीय लढ्यात भाग घेत नसत. बंगालमध्ये शेतकर्यांची कृषकसभा होती. जमायत-उल्-उलेमा आणि अहरार यांनी राष्ट्रसभेच्या सर्वसामान्य कामात, एवढेच नव्हे तर लढ्यातही सदैव भाग घेतला आहे. त्यांनी त्यासाठी हालअपेष्टा भोगल्या आहेत. ब्रिटिश सत्तेशी शब्दापलीकडे मुसलमानांच्या ज्या संस्थेचा कधी लढा आला नाही अशी एकच संस्था म्हणजे मुस्लिम लीग. तिच्यात जरी पुढे अनेक बदल झाले, वाढ झाली, पुष्कळ लोक तिच्यात आले तरी वरिष्ठ वर्गीयांचे सरंजामशाही नेतृत्व कधी गेले नाही.
ते शिया मुसलमानही स्वतंत्रपणे संघटित होऊन उभे होते. त्यांचे विशिष्ट असे धैय नव्हते. राजकीय हक्कांच्या मागणीपुरते त्यांचे हे स्वतंत्र संघटन होते. इस्लामच्या आरंभीच्या काळात खिलफतीसाठी अरबस्थानात तीव्र झगडा सुरू झाला. त्यातून पुढे दोन पंथ निर्माण झाले : सुन्नी आणि शिया. हे भांडण चिरंजीव झाले आहे आणि अद्यापही हे दोन पंथ अलग राहतात. त्या मूळच्या झगड्यातील राजकीय भाग आज नावालासुध्दा अर्थातच उरलेला नाही. हिंदुस्थानात सुन्नी मुसलमान बहुसंख्य आहेत. इतर मुस्लिम देशांतुनही सुन्नींचीच संख्या अधिक आहे. फक्त इराणात शियापंथीयांचे बहुमत आहे. शियासुन्नींमध्ये धार्मिक झगडे अधूनमधून होत असतात. हिंदी शिया-संघटना मुस्लिम लीगपासून निराळी आहे आणि तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. सर्वांसाठीच संयुक्त मतदारसंघ असावेत असे शियांचे म्हणणे आहे. परंतु लीगमध्येही काही प्रतिष्ठित शियापंथी आहेत.
या सर्व मुस्लिमसंस्था. आणखीही काही (अर्थात मुस्लिम लीग नव्हे) आझाद मुस्लिम कॉन्फरन्ससाठी एकत्र झाल्या होत्या. मुस्लिम लीग विरोधी अशी ही एक संयुक्त मुस्लिम आघाडी होती. १९४० मध्ये दिल्लीला आझाद मुस्लिम कॉन्फरन्सचे पहिले यशस्वी अधिवेशन झाले.