भारतातील ब्रिटिश राज्यकारभारातील विसंगती

राममोहन रॉय : छापखाने : सर वुइल्यम जोन्स : बंगालमध्ये इंग्रजी शिक्षण

भारतातील ब्रिटिश राजवटीचा विचार करीत असताना एक ठळक विरोध पावलोपावली आपल्या डोळ्यांसमोर येतो.  ब्रिटिश लोक हिंदुस्थानात सत्ताधीश झाले; जगातील अतिबलाढ्य असे त्यांचे एक साम्राज्य झाले याचे कारण नव्या प्रचंड यांत्रिक उद्योगधंद्याच्या संस्कृतीचे ते पुरस्कर्ते होते, अग्रदूत होते.  जगाचे स्वरूप पार बदलू पाहणार्‍या नव्या ऐतिहासिक शक्तीचे ते प्रतिनिधी होते.  नवीन बदल, क्रांती यांचे ते त्यांना स्वत:ला त्याची काही कल्पना नसूनसुध्दा पुढारी होते, प्रणेते होते.  परंतु भारतात तो बदल होऊ नये म्हणून जाणूनबुजून त्यांनी प्रयत्न केले.  स्वत:च्या फायद्यासाठी, देश आणि देशातील लोकांची पिळवणूक व लूट करता येण्यासाठी, आपली सत्ता दृढमूल करण्यासाठी म्हणून जितके काही नवीन सुधारणेचे स्वरूप आणणे जरूरच होते तितकेच फक्त त्यांनी आणले.  त्यांच्यातील जो सामाजिक वर्ग येथे आला, त्याची दृष्टी प्रतिगामी, त्याचे हेतूही प्रतिगामी असत, परंतु हे मुख्य कारण नव्हे.  प्रगतिपर असे फरक येथे केले, करू दिले तर शेवटी हिंदी राष्ट्र प्रबळ होईल आणि ब्रिटिशांची सत्ता दुबळी होईल असे त्यांना वाटे, म्हणून मुद्दाम हेतुपूर्वक त्यांनी अशी क्रांती होण्याला अडथळा केला.  हिंदी जनतेशी एकरूप होण्याची त्यांची इच्छा नव्हती, ते एकरूप होणे शक्य नव्हते.  राज्यकर्ते म्हणून अलग राहणे हेच त्यांच्या नशिबी होते.  त्यामुळे आपल्याभोवती सर्वस्वी निराळे, द्वेषाने-वैराने भरलेले लोक आहेत असेच त्यांना नेहमी वाटे व त्यांच्या सर्व धोरणात, विचारात जनतेची भीती सारखी सदैव भरलेली दिसते.  काही फेरबदल झाले व ते प्रगतिपर होते.  परंतु ब्रिटिशांच्या धोरणाला न जुमानता ते झाले.  ब्रिटिशांच्या द्वारा नूतन पश्चिमेचा जो आघात येथे होऊ लागला त्यातूनच ही प्रगतिपर फेरबदल करण्याची प्रेरणा येत होती.

व्यक्ती या नात्याने काही इंग्रज, कोणी शिक्षणतज्ज्ञ, कोणी प्राच्यविद्याविशारद, कोणी वृत्तपत्रकार, कोणी धर्मप्रसारक अशा प्रकारे आले.  पाश्चिमात्य संस्कृती येथे आणण्यात त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला व असे करताना कधी कधी स्वत:च्या सरकारशीही त्यांचे खटके उडाले.  अर्वाचीन शिक्षणाच्या परिणामांची सरकारला धास्ती वाटे आणि म्हणून शिक्षणप्रसाराच्या कार्यात सरकार अनेक अडथळे निर्माण करी, तरीही काही विद्वान व कळकळीचे इंग्रज पुरस्कर्ते पुढे सरसावले.  हिंदी विद्यार्थ्यांचे उत्साही मेळावे त्यांनी आपल्याभोवती गोळा केले आणि इंग्रजी विचार, इंग्लिश वाङ्मय, इंग्रजी राजकीय परंपरा यांच्याशी भारतीयांचा परिचय होऊ लागला.  (मी इंग्रज असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्या इंग्रज शब्दात इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंड या तिन्ही देशांतील लोकांचा अंतर्भाव करतो.  वास्तविक असे करणे चूक व अयोग्यही आहे हे मी जाणतो.  परंतु ब्रिटिशर हा शब्द मला आवडत नाही आणि ब्रिटिश शब्दातही आयरिश बहुतेक अंतर्भूत होत नसावेत.  आयरिश, स्कॉच व वेल्स लोकांनी इंग्रज हा शब्द त्यांनाही लावल्याबद्दल क्षमा करावी.  हिंदुस्थानात त्या सर्वांनी एकाच प्रकारे काम केले आहे आणि हिंदी लोक त्या सर्वांकडे हे सारे एकच आहेत अशा दृष्टीने पाहात आले आहेत.) ब्रिटिश सरकारला शिक्षणप्रसार जरी आवडत नव्हता तरीही राज्यकारभाराच्या वाढत्या पसार्‍यासाठी भरपूर कारकून मिळावेत म्हणून त्यांनाही काही तजवीज करणे प्राप्तच होते.  कारकून म्हणून काम करण्यासाठी इंग्लंडमधून हजारो लोक आणणे सरकारला परवडलेही नसते.  म्हणून आस्ते आस्ते शिक्षण वाढू लागले, आणि हे शिक्षण मर्यादित आणि विकृत असले तरीही त्यामुळे हिंदी लोकांच्या बुध्दीला नवीन कल्पना कळू लागल्या, नव्या स्फूर्तिदायक विचारांच्या वाटा मोकळ्या झाल्या.

हिंदी लोकांना छापखाना आणि सर्वच यंत्रे म्हणजे भीतिदायक आणि स्फोटक वाटत.  त्यांच्या प्रसाराने राजद्रोह वाढेल आणि उद्योगधंद्यांना पायबंद असेल अशी त्यांना भीती वाटे.  याबाबत हैदराबादच्या निजामाची मोठी गमतीदार पुढीलप्रमाणे गोष्ट आहे.  एकदा हैदराबादच्या निजामाने युरोपियन यंत्रे पाहण्याची इच्छा दर्शविली.  तेव्हा ब्रिटिश रेसिडेंटाने एक छापखाना आणि एक एअर-पंप कोठून तरी आणून दाखविला.  निजामाची क्षणिक जिज्ञासा तृप्त झाल्यावर त्या वस्तू अजबखान्यात नेऊन बाजूला ठेवण्यात आल्या, परंतु कलकत्त्याच्या सरकारने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांनी नापसंती दर्शविली.  विशेषत: हिंदी संस्थानांत छापखान्याचे यंत्र दाखविल्याबद्दल त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.  सरकारची इच्छा असेल तर गुप्तपणे हे मुद्रणयंत्र मोडून टाकण्याची व्यवस्था करतो असे रेसिडेंटने कळविले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel