हिंदुस्थानवर स्वारी होण्याचा व पूर्वेकडील काही मुलूख शत्रूच्या ताब्यात जाण्याचा प्रसंग आला तर हिंदुस्थानातील इतर प्रांतांतून चाललेला मुलकी कारभारसुध्दा ढासळून पडेल व जिकडे तिकडे अंदाधुंदी माजेल असा सर्वत्र समज जिकडेतिकडे देशभर पसरला होता. मलाया व ब्रह्मदेशात जे काही घडले ते आमच्या डोळ्यांसमोर होतेच. युध्दातील ज्याचे पारडे जरी शत्रूच्या बाजूला झुकले तरीसुध्दा ह्या देशातला बराच मोठा भाग व्यापणे त्याला शक्य होईल असे कोणाला फारसे वाटतच नव्हते. आमचा हिंदुस्थान केवढा प्रचंड, विस्ताराचा कितीतरी मुलूख आमच्याचकडे राहणार, आणि जपानची चीनवर स्वारी झाली होती तेव्हा देशाचा विस्तार कसा उपयोगी पडतो ते आमच्या लक्षात आले होते. पण शत्रूचा प्रतिकार करीत राहण्याचा जनतेचा निर्धार असला तरच देशाच्या विस्ताराचा हा उपयोग करून घेता येतो, लोटांगण घालून शत्रूला शरण जाण्याचे जर जनतेच्या मनात असले तर देश कितीही मोठा असला तरी व्यर्थ. शत्रूपुढे माघार घ्यावी लागली तर दोस्तांच्या फौजा हिंदुस्थानात बरेच आतवर हटून देशात आत कोठेतरी बचावाची फळी धून बसतील व देशाचा बराचसा आपल्यापुढचा मुलूख शत्रूला मोकळा सोडतील अशी बरीचशी खात्रीलायक बातमी होती, पण चीनमध्ये घडले त्याप्रमाणे इकडेही शत्रूने हा मोकळा सापडलेला मुलूख आपल्या ताब्यात न ठेवता त्यांनीही काही थोड्याच मुलुखापुरता ताबा केला असता. तेव्हा प्रश्न असा पडला की, शत्रू देशात घुसलेल्या भागाखेरीज अन्यत्रही सरकारचा कारभार थंड पडणार तो मुलूख व हा दोन सैन्यांमधला मोकळा मुलूख यातील प्रजेची जी अवस्था होणार त्याकरिता काय उपाय योजावे. असल्या प्रसंगाला लोकांचे मन तयार करावे व त्यांनी प्रत्यक्ष काय करावे याचे शिक्षणही त्यांना द्यावे ह्या हेतूने आम्ही शक्य तितका प्रयत्न चालवला. त्याकरिता, अशी वेळ आली की आपापल्या टापूपुरता बंदोबस्त ठेवणे व लोकांत शिस्त राखणे अशी कामे करावयाला तयार कशी स्वयंसैनिक दले वगैरे संस्था उभारण्याला आम्ही उत्तेजन देत होतो. त्याबरोबरच, काहीही झाले तरी शत्रूला प्रतिकार केलाच पाहिजे असा आग्रह लोकांपाशी आम्ही सारखा धरीत होतो.
चीनमध्ये इतकी वर्षे इतक्या निर्धाराने लोकांनी शत्रूशी लढाई का चालवली ? विशेषत: सोव्हिएट युनियन (संघा) मधील रशियन व इतर लोकांनी एवढ्या धीराने, चिकाटीने व मनापासून, शत्रूचा प्रतिकार का चालवला ? सोव्हिएट संघाखेरीज इतर देशांतले लोकसुध्दा मोठ्या शौर्याने लढत होते, त्याचे कारण त्यांची देशभक्ती, परकीय आक्रमणाची भीती, वंशपरंपरा अबाधित चालत आलेली जीवनसरणी तशीच राखण्याची त्यांची इच्छा. पण तनमनधन अर्पण करून युध्दकार्य चालविण्याच्या कामी, काय असेल ते असो, रशिया व इतर देश यांत काहीतरी कमी-अधिक वाटे. डंकर्क येथे व त्यानंतर ब्रिटिश मोठ्या शौर्याने लढले व अन्यत्रही इतरांनी पराक्रमाची शर्थ केली, पण आलेला प्रसंग निभावून त्यातून पार पडले की जरा सबुरीने घेण्याची वृत्ती या सार्या देशांतून दिसे; हे चालू असलेले युध्द तर जिंकले पाहिजेच, पण पुढे काय, अशी शंका या सार्या देशांतून डोकावते आहे असा भास होई. जी काय माहिती सोव्हिएट युनियनबद्दल मिळत होती, त्यावरून पाहता त्या देशात मात्र युध्दानंतरच्या भावी कालाबद्दल काही कोणाला शंका वाटत नव्हती, काही वाद चालत नव्हते, (अर्थात हे खरे की त्या देशात काही वाद घालायची कोणाला सोय नव्हती.) वर्तमान व भविष्यकाळाबद्दल तेथल्या लोकांना मोठी निश्चिती वाटे.