जीवनकार्य सिध्द झाल्याची ती खूण आहे. पण प्रेषितांचा संदेश जगाला पटवून देणार्या नेत्याला जर लोकांनी धोंडे मारले तर त्याचा अर्थ असाही असेल की त्या नेत्याचे ठरीव कार्य करायला अवश्य तो सुज्ञपणा त्या नेत्याजवळ नव्हता किंवा तो स्वत:लाच प्रेषित समजू लागला व त्यामुळे त्याच्या हातून ते कार्य होऊ शकले नाही. अशा रीतीने एखादा नेता लोकांच्या अवहेलनेला बळी पडला तर नेता म्हणून त्याचे कार्य विफल झाले असले तरी व्यक्तिश: तो माननीय आहे की नाही हे पुढे केव्हातरी भविष्यकाळीच ठरणार. पण निदान एवढे तरी खरे की, तात्पुरत्या लाभाकरता तत्त्व सोडले पण अखेर कार्याचे हित काहीच साधले नाही. अशी जी चूक सामान्यपणे नेत्यांच्या हातून घडते ती तरी त्याची टळते. इतरांचे मन राखावे ह्या हेतूने सत्य दडपून ठेवण्याची सवय कोणालाही जडली की त्याच्या विचाराच्या पोटी विकृतीच जन्माला येते.
''सत्यप्राप्तीची साधना चालू असतानाच त्या सत्याचा सर्वांनी स्वीकार करावा असा प्रयत्न त्या साधनेबरोबर जोडीने चालावा एवढ्याकरता काही व्यवहारिक मार्ग सापडतो का? प्रतिपक्षाविरुध्द व्यूह कसा रचावा या शास्त्रातल्या तत्त्वांचे मनन केले तर या प्रश्नाचे एक संभाव्य उत्तर सुचते. त्यात एक तत्त्व असे आहे की, आपल्याला कोणती गोष्ट साधावयाची आहे ती एक निश्चित करून ती साध्य म्हणून सारखे ध्यान ठेवले पाहिजे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच प्रस्तुत परिस्थिती ओळखून, काळवेळ पाहून, त्या साध्याला गाठण्याकरता मार्ग बदलीत राहणे हेही महत्त्वाचे आहे. सत्याला विरोध होणे, विशेषत: ते सत्य नव्या कल्पनेचे रूप घेऊन पुढे आले तर त्या नव्या विचाराला विरोध होणे अटळ आहे. पण साधावयाचे उद्दिष्ट कोणते एवढेच पाहात न बसता ते साधायचे कसे, इकडेही लक्ष ठेवले तर त्या विरोधाची तीव्रता पुष्कळ अंशी कमी करता येते. फारा दिवसांच्या खटपटीने मजबूत केलेले एखादे ठाणे जिंकून घ्यायचे असले तर त्याच्यावर समोरासमोर हल्ला चढविणे टाळावे व त्याच्या बगलेवर बळून जाऊन तिकडून हल्ला चढवला तर त्या ठाण्याची कमजोर बाजू मोकळी सापडते व तिकडून घुसण्यास वाट मिळते. पण अशा तर्हेने समोरून वार करणे टाळून बाजूने हल्ला करण्याकरिता वळताना साध्य काय ते लक्षात न राहून भलतीकडेच गेलो असे होऊ नये म्हणून दक्ष राहिले पाहिजे. कारण असे भलतीकडे जाऊन जर सत्याची वाट सुटली तर त्यापेक्षा सत्याला घातक असे दुसरे काहीही नाही.
''विविध नव्या नव्या विचारांना मान्यता कशी मिळत गेली याचा इतिहास पाहिला तर असे दिसते की, ते विचार अगदी नवे कोरे आहेत असे न म्हणता एखाद्या प्राचीन तत्त्वाची अगर प्रथेची ती एक आधुनिक रीतीने उजळणी आहे अशी कोणी मांडणी केली तर विरोध कमी होऊन मान्यता सुलभ होत गेली आहे. ही युक्ती साधताना कोणाला कपटाने फसविण्याची काहीच आवश्यकता नाही; अवश्य केले पाहिजे ते इतकेच की नव्या विचारांचा जुन्या प्राचीन तत्त्वाशी संबंध येतो तो मात्र कसोशीने शोधला पाहिजे. कारण जगात अगदी कोरे नवे असे काही नाहीच, 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्.' *
--------------------------
* लिडेल हार्ट— "दी स्ट्रॅटेजी ऑफ इनडिरेक्ट अॅप्रोच" (अप्रत्यक्ष मार्गाने उद्दिष्ट साधण्याची कला) प्रस्तावना.