हिंदी कलेचे गुणग्रहण करणारे, हिंदी कलेवर मत देताना, हिंदी कलेचे परीक्षण करताना नवी वेगळी कसोटी लावणारे जे काही इंग्रज लोक आहेत त्यात लॉरेन्स बिनियन आणि ई. बी. हॅव्हेल हे येतात.  हिंदी कलेतील ध्येय, हिंदी कलेच्या मुळाशी असलेली वृत्ती, त्या कलेचा हेतू याविषयी हॅव्हेलला उत्साहाचे भरते येते.  तो एक मुद्दा जोराने मांडतो की राष्ट्रीय चारित्र्य, स्वभाव व विचार यांचा यथार्थ आविष्कार, यांचे यथार्थ प्रतिबिंब थोर राष्ट्रीय कलेतून प्रतीत होते, परंतु त्या कलेमागील आदर्श व ध्येये ही समजली असली तरच त्या कलेचाही रसास्वाद घेणे शक्य येईल.  परंतु सत्ता गाजविणारे परकी लोक भलताच अर्थ घेऊन त्या ध्येयांची सदैव कुटाळकी करतात आणि बौध्दिक वैराची बीजे मात्र पेरतात.  हॅव्हेल म्हणतो की, भारतीय कला मूठभर काव्यशास्त्रपारंगतांपुरती मर्यादित नव्हती.  धर्म आणि तत्त्वज्ञान यांतील मध्यर्ती कल्पनांचा संदेश सर्व जनतेला समजावून सांगण्यासाठी हिंदी कलेचा अवतार होता,  ''भारतीय जीवनाशी ज्यांचा निकट संबंध आला असेल त्या सर्वांना दिसून येईल की, भारतीय कलेचे हे शिक्षणात्मक ध्येय, लोकांना धर्मतत्त्वे व तत्त्वज्ञानातील विचार समजावून सांगण्याचे ध्येय सफळ झाले आहे; चिनी शेतकरी पाश्चिमात्य अर्थाने जरी अशिक्षित असले तरी जगातील इतर कोणत्याही शेतकरी वर्गापेक्षा ते अती सुसंस्कृत आहेत.'' *
---------------
*  इ. बी. हॅव्हेल 'भारतीय कलेची ध्येये' (१९२०) प्रस्तावना : पृष्ठ १९

संस्कृतकाव्य व हिंदी संगीत यांतल्याप्रमाणेच कलेतरी कलावंताने निसर्गाच्या विविध वृत्तींशी एकरूप व्हावे.  मानवाचे विश्वाशी आणि निसर्गाशी जे तत्त्वत: शुध्द ऐक्य आहे ते प्रकटविण्यासाठी अशी एकतानता होणे अवश्य आहे असे गृहीत धरलेले आहे.  सार्‍याच आशियातील कलेतील ही मूलभूत कल्पना आहे; आणि म्हणून आशियातील निरनिराळ्या देशांमधील कला स्थानभेदामुळे निरनिराळी दिसली तरीही तिच्यात एक प्रकारचे ऐक्य दिसल्याशिवाय राहात नाही.  प्राचीन भारतीय चित्रकलेचे अवशेष फारसे उपलब्ध नाहीत.  भिंतींच्या गिलाव्यावर चित्रे रंगवलेली अजिंठा चित्रकला तेवढी उरली आहे.  चित्रकलेचे नमुने काळाच्या ओघात नष्ट झाले असावेत.  चीन आणि जपान यांचे श्रेष्ठत्व ज्याप्रमाणे चित्रकलेत दिसून येते त्याप्रमाणे भारतीय अपूर्वत्व व वास्तुकला यात दिसून येते.

युरोपियन संगीताहून हिंदी संगीत अगदी भिन्न आहे.  आपल्यापरी हिंदी संगीताची खूप वाढ झाली होती.  चीन आणि जपान सोडून उर्वरित आशियावर हिंदी संगीताची मोहिनी पडली होती.  जेथे जेथे अरबी संस्कृती पसरली व फुलली त्या इराण, अफगाणिस्तान, अरबस्थान, तुर्कस्थान, इत्यादी देशांत, त्याचप्रमाणे उत्तर अफ्रिकेतही हिंदी संगीताचा संबंध पोचून एक नवे सांस्कृतिक बंधन निर्माण झाले.  या सर्व देशांमध्ये शास्त्रीय हिंदी संगीतातील गोडी कळण्यासारखी आहे असे वाटते.

हिंदुस्थानात किंवा आशियात इतरत्रही खोदीव मूर्तीसंबंधी एक प्रकारचा धार्मिक निषेध असल्यामुळे कलेच्या वाढीवर त्याचा महत्त्वाचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही.  वेद हे मूर्तिपूजेच्या विरुध्द होते.  बौध्द धर्मातही फार उशिरा बुध्दांचे रूप शिल्पांत व चित्रांत दाखविले जाऊ लागले. मथुरेच्या संग्रहालयात बोधिसत्त्वांची एक प्रचंड मूर्ती आहे.  ती सामर्थ्य व शक्ती यांनी संपन्न आहे.  ख्रिस्त शकाच्या आरंभीच्या कुशान काळातील ही कलानिर्मिती आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel