ग्रीक स्त्रिया हिंदुस्थानात विशेष मानल्या जात असे दिसते.  प्राचीन नाटकांतून राजदरबारात असलेल्या दासी ग्रीक असत असे उल्लेख आहेत.  पश्चिम किनार्‍यावरील प्रसिध्द बंदर जे भडोच येथे येणार्‍या मालांत गाणारी मुले व मुलीही असत असे म्हणतात.  चंद्रगुप्त मौर्याच्या जीवनाचे वर्णन करताना मेग्यास्थेनीस लिहितो, ''राजाचे अन्न बायका तयार करीत.  त्याच त्याला वाढीत, आणि मद्यही असे.''  सार्‍याच हिंदी लोकांत मद्याचा बराच प्रसार आहे.  ही दारू पुष्कळशी ग्रीस देशातून व ग्रीक वसाहतींतून येत असे.  एक प्राचीन तामिळ कवी म्हणतो, ''यवन लोक (म्हणजेच आयोनियन ग्रीक) आपल्या चांगल्या गलबतांतून सुगंधी थंडगार असे मद्यही आणीत.''  एका ग्रीक बखरीत ''पाटलिपुत्राच्या राजाने मधुर मद्य, वाळविलेले सुके अंजीर आणि खोटा युक्तिवाद करून सत्याचा आभास निर्माण करणारा एखादा पंडित विकत घेऊन पाठवून देण्याविषयी अँटिओकसला लिहिले होते,'' असा उल्लेख आहे.  हा राजा अशोकाचा पिता बिंदुसार हा बहुधा असावा.  अँटिओकसने उत्तर धाडले, ''अंजीर आणि मद्य विकत घेऊन पाठवतो, परंतु पंडिताची विक्री करण्यास कायद्याची बंदी आहे.''

ग्रीक वाङ्मयावरून असे दिसते की, पुरुषांच्या अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत प्रतिकूल मत नसे, उलट ते एक प्रकारे अद्‍भुतरम्य ठरवून पसंत केले जात.  तरुण स्त्री-पुरुषांना समाजात वेगळे ठेवून त्यांना परस्परांशी बोलू न देण्याचा हा परिणाम असावा.  इराणातही हीच वृत्ती दिसते आणि पर्शियन वाङ्मय अशा उल्लेखांनी भरलेले आहे.  पुरुषालाच सखी म्हणून संबोधण्याचा जणू संकेतच पडला.  परंतु संस्कृत साहित्यात अशी गोष्ट कुठेही दिसत नाही.  अनैसर्गिक संबंध तेथे निषिध्द होता.  तो कधी प्रचारात नव्हता व कोणी त्याला उत्तेजनही दिलेले दिसत नाही.

हिंदुस्थान आणि ग्रीस यांचे अतिप्राचीन काळापासून संबंध होते, आणि पुढेपुढे तर ग्रीस आणि ग्रीस देशाच्या संस्कृतीने व्यापलेल्या पश्चिम आशियाशी भारताचा अधिकच दाट संबंध आला.  उज्जयिनीच्या वेधशाळेचा इजिप्तमधील अलेक्झांड्रियाशी संबंध होता.  या दीर्घकालीन संबंधामुळे दोन्ही देशांतील प्राचीन संस्कृतींमध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण कितीतरी झाली असेल.  कोठल्यातरी एका ग्रीक पुस्तकात एका आख्यायिकेचा उल्लेख आहे की, काही भारतीय पंडित सॉक्रे़टिसाला भेटायला गेले होते.  त्यांनी त्याला प्रश्नही विचारले.  हिंदी तत्त्वज्ञानाचा पायथॅगोरसवर फारच परिणाम झाला होता.  प्रो. एच. जी. रॉलीन्सन लिहितो, ''पायथॅगोरसने ज्या ज्या धार्मिक, तत्त्वज्ञानातील किंवा गणितातील प्रक्रिया शिकवल्या, त्या सर्व भारतीयांस ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापूर्वीच ज्ञात होत्या.''  प्राचीन ग्रीक-रोमन संस्कृतीचा महान पंडित आर्विक याने प्लेटोच्या 'रिपब्लिक' चा अर्थ भारतीय विचारावरूनच आधार घेऊन लाविलेला आहे. *  ग्रीक
-----------------------
*  'ग्रीक कॉमनवेल्थ' या आपल्या पुस्तकात झिमर्नने आर्विकच्या 'प्लेटोचा संदेश' या पुस्तकाचा उल्लेख केला आहे.  मी पुस्तक पाहिलेले नाही.

ज्ञेयवाद म्हणजे भारतीय विचार आणि प्लेटोचे विचार यांचे मिश्रण करण्याचा निश्चित प्रयत्न होता.  टायाना येथील तत्त्वज्ञानी अ‍ॅपॉलोनियस हा ख्रिस्त शतकाच्या आरंभी तक्षशिला विद्यापीठात बहुधा आला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel