ग्रीक परंपरेत वाढलेल्या युरोपियनांनी ग्रीक दृष्टीकोणातून प्रथम भारतीय कलेचे परीक्षण केले. गांधार आणि सरहद्दप्रांतात ग्रीको-बौध्दधर्मी कलेचे नमुने त्यांना पहायला मिळाले. त्यांत काहीतरी ओळखीचे आहे असे त्यांना वाटले. हिंदुस्थानातील इतर सारे प्रकार म्हणजे मूळ ग्रीक कलेचे बिघडलेले रूप आहे असे मत त्यांनी ठोकून दिले. परंतु हळूहळू नवीन दृष्टी आली, आणि भारतीय कला स्वतंत्र जिवंत कला आहे, ग्रीको-बुध्दकलेचे नमुने जे गांधार वगैरे भागात सापडले त्यापासून भारतीय कला निघाली असे नसून उलट ते नमुने म्हणजे तिचे एक फिक्कट रूप होय असे मत सुचविण्यात आले. ही नवीन दृष्टी इंग्लंडमधून आली नसून इंग्लंडेतर युरोपातून आली. हिंदी कला किंवा संस्कृत वाङ्मय यांच्याविषयीची गुणग्राही, रसग्राही वृत्ती इंग्लंडात न आढळता तदितर युरोपीय देशांत आढळावी हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यामध्ये जे दुर्दैवी राजकीय संबंध आहेत त्यामुळे ही रसग्राही वृत्ती कितपत मर्यादित झाली असावी त्याचा मनात विचार येऊन पुष्कळदा आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. या राजकीय संबंधांचा असा दुष्परिणाम होणे शक्य आहे, परंतु यापेक्षाही अधिक मूलगामी कारणे असली पाहिजे. कितीतरी असे इंग्रज पंडित विचारवंत आणि कलावंत आहेत की भारतीय दृष्टी आणि भारतीय आत्मा यांची त्यांना ओळख आहे. त्यांपैकी कितीतरी जणांनी आमची प्राचीन लेणी उजेडात आणायला आणि जगापुढे त्यांतील अर्थ मांडायला मदत केली आहे. शिवाय पुष्कळ असे आहेत की त्यांनी हिंदुस्थानची सेवा केली आहे, हिंदुस्थानशी खरी मैत्री जोडली आहे आणि त्यासाठी हिंदुस्थान कृतज्ञही आहे. परंतु हे सारे असूनही इंग्रज लोक आणि हिंदी लोक यांच्यामध्ये एक प्रकारचा दुरावा आहे आणि हा दुरावा वाढतच जात आहे. भारतीयांना असा हा दुरावा का वाटतो त्याची कारणे मी तरी सहज समजू शकतो; कारण गेल्या काही वर्षात असे पुष्कळ घडले आहे की, ज्यामुळे न भरून येण्यासारख्या जखमा आमच्या हृदयाला झाल्या आहेत. भिन्न कारणासाठी अशाच प्रकारची प्रतिक्रिया इंग्रजांच्यावरही झाली असेल. आमचा काही दोष नसता जगाच्या न्यायालयासमोर हिंदी लोक आम्हाला अपराधी ठरवतात, ठरवू बघतात म्हणून तेही प्रतिकूल वृत्तीचे झाले असावेत. परंतु केवळ राजकीय प्रश्नांपेक्षाही ही भावना अधिक खोल आहे आणि ती नकळत दिसून येते, प्रकटही होते. विशेषत: बुध्दिमान इंग्रजवर्गाला या भावनेने पछाडलेले दिसते. जगात जे काही वाईट आहे, जे मूळ पाप जगात आले त्याचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हिंदी मनुष्य आणि म्हणून त्याच्या सर्व कृतीही तशाच असणार अशी इंग्रज पंडितांची, सुशिक्षित बुध्दिमंतांची सर्वसाधारण कल्पना आहे. इंग्रजी विचाराचा किंवा इंग्रज बुध्दीचा ज्याला प्रतिनिधी म्हणून समजता येणार नाही, अशा एका लोकप्रिय इंग्रज ग्रंथकाराने नुकतेच एका पुस्तक लिहिले आहे. त्यात जे जे भारतीय आहे, त्या सर्व गोष्टींबद्दल पराकाष्ठेचा खुनशीपणा, द्वेष व तिरस्कार दाखविलेला आहे. एक अधिक प्रतिष्ठित आणि प्रतिनिधीभूत असा ग्रंथकार ऑस्बर्ट सिट्वेल हा आपल्या, 'चला, माझ्याबरोबर निसटा' ('Escape with me', १९४१) या पुस्तकात म्हणतो, ''हिंदुस्थान म्हटले की जरी विविध प्रकारच्या अद्भुत गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहात तरी एकंदरीत हिंदुस्थान अद्यापही नकोसा वाटे.'' तो पुढे आणखी म्हणतो, ''पुष्कळ वेळा हिंदू कलाकृतींचा बुळबुळीत अर्थ हातात न सापडता निसटून जातो, वीट येतो व त्यामुळे त्यांना वैगुण्य येते.''
हिंदी कला किंवा एकंदरीत हिंदुस्थान यासंबंधी ही अशी मते बाळगायला सिट्वेल यांना अर्थातच पूर्ण मुभा आहे, त्यांच्या दृष्टीने ती मते योग्यही असतील, त्यांना तसे वाटते, खरोखरच मनापासून वाटते अशी माझी पूर्ण खात्री आहे. हिंदुस्थानात बरेचसे असे आहे की ते पाहून मलाही कधीकधी वीट येतो, परंतु सबंध हिंदुस्थानाचा सरसकट वीट येत नाही; आणि हे स्वाभाविकच आहे, कारण मी स्वत: हिंदी आहे, तेव्हा मी कसाही कवडीमोल असलो तरी मला माझाच द्वेष करणे सोपे नाही. पण या लेखकांच्या लिखाणात नुसत्या कलेसंबंधी मत किंवा कलेविषयी एक दृष्टिकोण एवढेच येत नसून सबंध देशाविषयीच एक प्रकारचा तिटकारा किंवा विरोध, एक प्रकारची स्नेहहीन वृत्ती, सहेतुक व अहेतुक दिसून येते. ज्यांच्या बाबतीत आपण अन्याय केलेला असतो, ज्यांचे नुकसान केलेले असते, ते आपल्याला नकोसे वाटतात, त्यांचा आपण द्वेष करतो हे तर खरे नसेल ?