भगवान् ज्ञातसर्वार्थ इश्वरोऽपि तदन्यथा ।

कर्तुं नैन्छद्विप्रशापं कालरुप्यन्वमोदत ॥२४॥

कोणी न सांगतां हें पेखणें । जाणितलें सर्वज्ञें श्रीकृष्णें ।

परी द्विजशापु अन्यथा करणें । हें निजमनें स्पर्शेना ॥८७॥

म्हणाल हें नव्हेल त्यासी । पालटवेना द्विजशापासी ।

जो निमाल्या आणी गुरुपुत्रासी । कृष्ण कळिकाळासी नियंता ॥८८॥

पाडूनि कळिकाळाचे दांत । देवकीचे गतगर्भ आणीत ।

ईश्वरा ईश्वरु श्रीकृष्णनाथ । जाणे सर्वार्थनिजसिद्धी ॥८९॥

निद्रा न मोडितां तिळभरी । मथुरा आणिली द्वारकेभीतरी ।

श्रीकृष्ण काय एक न करी । तोही ममता न धरी कुळाची ॥३९०॥

निजकुळक्षयो जर्‍ही आला । तर्‍ही अन्यथा न करी ब्राह्मणबोला ।

ब्राह्मणें पांपरा जरी हाणितला । तो हृदयीं धरिला पदांकु ॥९१॥

तेंचि श्रीवत्सलांछन । सकळ भूषणां भूषण ।

हृदयीं मिरवी श्रीकृष्ण । यालागीं पूर्ण ब्रह्मदेवो ॥९२॥

श्रीकृष्ण शिरीं वंदी ब्राह्मन । अन्यथा न करी ब्राह्मणवचन ।

यालागीं ’ब्रह्मण्यदेवो’ पूर्ण । वेद बंदीजन वर्णिती ॥९३॥

ब्राह्मणरुप स्वयें श्रीहरी । यालागीं ब्राह्मणांचा कैवारी ।

कुळक्षयो जाहला जरी । तरी द्विजांवरी क्षोभेना ॥९४॥

ऐकोनि ब्राह्मणांचा शापु । न धरी मोहाचा खटाटोपु ।

म्हणे सिद्धी गेला कृतसंकल्पु । कुलक्षयानुरुपु संतोषे ॥९५॥

यापरी श्रीगोविंदु । काळरुपी मानी आनंदु ।

कुळक्षयाचा क्षितिबाधु । अल्पही संबंधु धरीना ॥९६॥;

पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथा । पुढील अध्यायीं ज्ञानकथा ।

अतिरसाळ स्वानंदता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥९७॥

जेथें नारद आणि वसुदेवा । संवाद होईल सुहावा ।

जनक आणि आर्षभदेवां । प्रश्नोत्तरीं जीवा स्वानंदु दाटे ॥९८॥

हे रसाळ ब्रह्मज्ञानमातु । चाखवीन निजपरमार्थु ।

एका जनार्दना विनवितु । श्रोते कृपा करितु अर्थावबोधें ॥३९९॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंसंहितायां

एकाकार-टीकायां विप्रशापो नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥श्रीः॥

॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel