श्रीभगवानुवाच ।
बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ।
गुणस्य मायामूलत्वात् न मे मोक्षो न बन्धनम् ॥१॥
उद्धवा बद्ध मुक्त अवस्था । जरी सत्य म्हणसी वस्तुतां ।
तरी न घडे गा सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥२९॥
बद्ध मुक्त अवस्था । माझे स्वरूपीं नाहीं तत्त्वतां ।
हे गुणकार्याची वार्ता । संबंधु तत्त्वतां मज नाहीं ॥३०॥
माझ्या निजस्वरूपाच्या ठायीं । बद्धमुक्तता दोनी नाहीं ।
बद्धता मुक्तता गुणांच्या ठायीं । आभासे पाहीं गुणकार्यें ॥३१॥
गुण ते समूळ मायिक । मी गुणातीत अमायिक ।
सत्यासी जैं बाधे लटिक । तैं मृगजळीं लोक बुडाले ॥३२॥
चित्रींचेनि हुताशनें । जैं जाळिजती पुरें पट्टणें ।
कां स्वप्नींचेनि महाधनें । वेव्हारा होणें जागृतीं ॥३३॥
सूर्यासी प्रतिबिंब गिळी । छाया पुरुषातें आकळी ।
समुद्र बुडे मृगजळीं । तैं मज गुणमेळीं बद्धता ॥३४॥
जैं जिभेसी केंसु निघे । जैं तळहातीं वृक्षु लागे ।
डोळ्यांमाजीं पर्वत रिगे । तैं मी गुणसंगें अतिबद्धु ॥३५॥
आकाश खोंचे साबळीं । काजळ लागे वारया निडळीं ।
कां विजूचे कपाळीं । बासिंग सकळी बांधावें ॥३६॥
गगन तुटोनि समुद्रीं बुडे । सपर्वत धरा वारेनि उडे ।
सूर्य अडखळोनि अंधारीं पडे । तरी मी सांपडे गुणांत ॥३७॥
अंतरिक्षगगनीं सरोवर । त्यामाजीं कमळें मनोहर ।
तो आमोद सेविती भ्रमर । ऐसें साचार जैं घडे ॥३८॥
तैं मी आत्मा गुणसंगे । नाना विषयभोग संभोगें ।
मग त्या विषयांचेनि पांगे । होईन अंगें गुणबद्धु ॥३९॥
त्रिगुण-अंगीकारें वर्ततां । गुणकार्य-तदात्मता ।
तेणें बद्ध मुक्त अवस्था । भासे वृथा भ्रांतासी ॥४०॥
गुणा आत्म्यासी भिन्नता । म्हणसी मानली तत्त्वतां ।
परी गुणसंगें आत्मा असतां । अवश्य विकारिता येईल ॥४१॥
अग्निसंगें पात्र तप्त । पात्रसंगे जळ संतप्त ।
जळतापें धान्यपाकु होत । तेवीं विकारवंत नव्हे आत्मा ॥४२॥
अग्नितापाआंत । आकाश नव्हे संतप्त ।
तेवीं गुणसंगा आंत । विकारवंत नव्हे आत्मा ॥४३॥
नट अंधत्वें अवगला । परी तो आंधळा नाहीं जाला ।
तैसा आत्मा गुणसंगें क्रीडला । तरी असे संचला निर्गुणत्वें ॥४४॥
नटु अंधत्वें नव्हे अंधु । आत्मा गुणसंगें नव्हे बद्धु ।
गुण मायिक आत्मा शुद्धु । या त्या संबंधु असेना ॥४५॥
आत्मा व्यापक गुण परिच्छिन्न । याही हेतु न घडे बंधन ।
सकळ समुद्राचे प्राशन । केवीं रांजण करूं शके ॥४६॥
मोहरीमाजीं मेरु राहे । पशामाजीं पृथ्वी समाये ।
मुंगी गज गिळोनि जाये । खद्योत खाये सूर्यातें ॥४७॥
मशकु ब्रह्मांडातें आकळी । पतंगु प्रळयानळ गिळी ।
तरी आत्मा गुणाचे मेळीं । गुणकल्लोळीं बांधवे ॥४८॥
यापरी न संभवे बद्धता । बद्धतेसवें गेली मुक्तता ।
बद्धमुक्तअवस्थांपरता । जाण तत्त्वतां आत्मा मी ॥४९॥
स्वप्नींचा अत्यंत सुकृती । अथवा महापापी दुष्कृती ।
दोन्ही मिथ्या जेवीं जागृतीं । तेवीं बद्धमुक्ती आत्मत्वीं ॥५०॥
हो कां जीवात्म्यासीची बद्धता । सत्य नाहीं गा तत्त्वतां ।
मा मज परमात्म्यासी अवस्था । बद्धमुक्तता ते कैंची ॥५१॥
बिंबीं प्रतिबिंबी नाहीं । मध्येंचि आरिशाचे ठायीं ।
मळ बैसले ते पाहीं । प्रतिबिंबाचे देहीं लागले दिसती ॥५२॥
तो मळू जैं पडे फेडावा । तैं आरिसाची साहणें तोडावा ।
परी प्रतिबिंब त्या साहणे धरावा । हें सद्भावा मिळेना ॥५३॥
जेवीं जीवशिवीं भेद नाहीं । दोष अंतःकरणाच्या ठायीं ।
तें चित्त शुद्ध केल्या पाहीं । बंधमोक्षा दोंही बोळवण ॥५४॥
तैसें आविद्यक हें सकळ । गुणकार्य नाना मळ ।
जीवा अंगीं प्रबळ । मूढमती स्थूळ स्थापिती ॥५५॥
जैं सत्त्वें गुण निरसी सबळ । तैं आविद्यक फिटती मळ ।
तेचि सद्विद्या होय निर्मळ । जीवचि केवळ शिव होये ॥५६॥
तेव्हां जीवशिव नामें दोनी । जातीं मजमाजीं समरसोनी ।
तैं मीच एकवांचूनी । आन जनीं वनीं असेना ॥५७॥
जीवभावनें मीचि जीवू । शिवभावनें मीचि शिवू ।
मी एकू ना नव्हे बहू । माझा अनुभवू मीचि जाणें ॥५८॥
झणीं आशंका धरिशी येथ । जरी जीव शिव तूंचि समस्त ।
तरी ते शुकवामदेवचि कां मुक्त । येरां म्हणत जड जीव ॥५९॥
तूचिं जीवरूपें तत्त्वतां । तरी हे ऐसी कां विषमता ।
शुकवामदेवांची अवस्था । वेदशास्त्रार्था संमत ॥६०॥
तींही लोकांमाजीं जाण । वेदवचन तंव प्रमाण ।
हें बोलणें विलक्षण । अप्रमाण जैं मानिसी ॥६१॥
हो कां वेद म्हणे जें निश्चित । तें बोलणें माझें निःश्वसित ।
तो मी स्वमुखीं जे बोलत । तें तूं अयुक्त म्हणतोसी ॥६२॥
जो मी वेदांचा वेदवक्ता । सकळ शास्त्रांचा मूळकर्ता ।
त्या माझें वचन म्हणसी वृथा । अतियोग्यता तुज आली ॥६३॥
वेदांचें जाण त्रिविध बंड । त्रिकांडीं केला तो त्रिखंड ।
वेदबळें बा पाखंड । वाजवी तोंड अव्हासव्हा ॥६४॥
भासले बहुसाल मज । वेदबळें नाना वाद ।
तो वेद माझा परोक्षवाद । तेणें तत्त्वावबोध केवीं होय ॥६५॥
शब्दज्ञान ब्रह्मज्ञान । बाह्यदृष्टीं समसमान ।
जेवीं वाल आणि वालभर सुवर्ण । तुकितां पूर्ण समता आली ॥६६॥
परी वाला सुवर्णा समता । मोलें कदा नव्हे तत्त्वतां ।
तेवीं वेदवादयोग्यता । ब्रह्मानुभविता सम नव्हे ॥६७॥
जो मी हरिहरां प्रमाण । त्या माझें वचन अप्रमाण ।
तूं म्हणसी हा ज्ञानाभिमान । हेंही जाणपण सांडावें ॥६८॥
माझें वचन सत्याचें सत्य । सत्य मानूनि निश्चित ।
येणें भावें साधे परमार्थ । हें ब्रह्मलिखित मद्वाक्य ॥६९॥
उद्धवा मज पाहतां । वसिष्ठवामदेवादि समस्तां ।
नेदखे बद्ध आणि मुक्तता । हा माझा तत्त्वतां निजबोधु ॥७०॥
मुक्तांचिये दृष्टीं । मुक्तच दिसे सकल सृष्टी ।
तेथें शुकवामदेवांची गोष्टी । वेगळी पाठीं केवीं राहे ॥७१॥
बद्धमुक्तांहूनि भिन्न । परमात्मा मी चिद्घन ।
जरी म्हणसी जीवासी बंधन । तेहीं सत्यत्वें जाण घडेना ॥७२॥