विचित्रभाषाविततां छन्दोभिश्चतुरुत्तरैः ।

अनन्तपारां बृहतीं सृजत्याक्षिपते स्वयम् ॥४०॥

मात्रात्रयमिळणीं लोक । ओंकार बोलती आवश्यक ।

हा ओंकार अलोलिक । अतिसूक्ष्म देख देहस्थ ॥२१॥

त्याचि ओंकारासी प्राणसंगती । आधारादि चक्रीं ऊर्ध्वगती ।

तेथ वाचांची होय अभिव्यक्ती । परा-पश्यंती-मध्यमा ॥२२॥

परावाचेच्या अभ्यंतरीं । जन्मे पश्यंती ज्येष्ठकारी ।

मध्यमा जन्मे तिच्या उदरीं । एवं परस्परीं जन्मती ॥२३॥

तैशाचि येरीतें येरी । नोसंडोनि क्षणभरी ।

चालती उपरांउपरी । चक्रींच्या चक्रांतरीं समवेत ॥२४॥

`आधारचक्रीं' परा वाचा । `स्वाधिष्ठानीं' जन्म पश्यंतीचा ।

`मणिपूरीं' हूनि `विशुद्धी' चा । ठायीं मध्यमेचा रिगुनिगू ॥२५॥

तेथोनियां मुखद्वारीं । वाचा प्रकाशे वैखरी ।

तैं स्वर-वर्ण-उच्चारीं । नानामंत्रीं गर्जत ॥२६॥

तेचि स्वर आणि वर्ण । सांगेन `स्पर्श' व्यक्तिलक्षण ।

`अंतस्थ' `ऊष्म' कोण कोण । विभागलक्षण अवधारीं ॥२७॥

केवळ `अ क च ट त प' देख । हे ककारादि पंच पंचक ।

स्पर्शवर्णाचें रूपक । अक्षरें निष्टंक पंचवीस ॥२८॥

सवर्णें गर्जतां उच्चार । ते अकारादि सोळाही स्वर ।

`य र ल व' यांचा विचार । जाण साचार `अंतस्थ' ॥२९॥

`श ष स ह' हे वर्ण चारी । `ऊष्म' बोलिजे शास्त्रकारीं ।

विसर्गादि अनुस्वारीं । `अंअः' वरी विभागु ॥४३०॥

येथ बावन्नावी मातृका एक । केवळ `क्ष' कारु गा देख ।

यांतु सानुनासिक निरनुनासिक । जाणति लोक शास्त्रज्ञ ॥३१॥

एवं स्वरवर्णविधिउच्चारीं । लौकिकी वैदिकी भाषावरी ।

वेदशास्त्रार्थप्रकारीं । वाढली वैखरी शब्दचातुर्यें ॥३२॥

बोलेंचि गा बोलाप्रती । चाळूनि नाना उपपत्ती ।

बोलें बोल निगृहिती । युक्तिप्रयुक्ती साधुनी ॥३३॥

ऐशिया नानाशब्दकुसरीं । अत्यंत विस्तरिली वैखरी ।

तेचि चौं चौं अक्षरीं । वाढवूनि धरी नाना छंदें ॥३४॥

वाढतां चतुरक्षरभेदें । उत्तरोत्तर नाना छंदें ।

वाढविलीं स्वयें वेदें । निजज्ञान बोधें बोलूनि ॥३५॥

अतएव अनंत अपार । अर्थतां शब्दतां अतिसुस्तर ।

माझ्या शब्दज्ञानाचा पार । सुरनर नेणती ॥३६॥

ऐशी वैखरीची अनंतशक्ती । यालागीं म्हणिजे ते `बृहती' ।

इच्या विस्ताराची गती । स्वयें नेणती शिव स्त्रष्टा ॥३७॥

हिरण्यगर्भत्वें स्वयें जाण । जीव-शिव-अंतर्यामीलक्षण ।

माझी वेदाज्ञा प्रकाशी आपण । जिचें नामाभिधान `वैखरी' ॥३८॥

जो मी वेदात्मा श्रीहरी । तो वेदु या रीतीं विस्तारीं ।

स्वयें विस्तारोनि संहारीं । मर्यादेवरी स्वकाळें ॥३९॥

मागां बोलिलीं छंदें जाण । त्या छंदांचें निजलक्षण ।

स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । जो वेदाचें कारण निजस्वरूप ॥४४०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel