भजन्ति ये यथा देवान् देवा अपि तथैव तान् ।

छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥६॥

जे जैसे देव यागीं यजिजती । तैसतैसीं फळें देव देती ।

न भजत्यांतें विघ्नें सूचिती । ऐसी गती देवांची ॥६५॥

जैसजैसा पुरुष वेंठे । तैसतैसी छाया नटे ।

तेवीं भजनें देव प्रसन्न मोठे । येरवीं उफराटें विघ्न करिती ॥६६॥

जंव जंव सूर्य प्रकाशत असे । तंव तंव छाया सरिसी दिसे ।

निजकर्मे देवही तैसे । कर्मवशें प्रसन्न ॥६७॥

सूर्यअस्तमानीं छाया नासे । अभजनें देव क्षोभती तैसे ।

एवं लांचुगे देव ऐसे । तूंही अनायासें जाणसी ॥६८॥

इतर देवांची कथा कोण । थोरला देव लांचुगा पूर्ण ।

तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥६९॥

त्याचें जीवें सर्वस्वें भजन । केल्या निजांग देऊनि होये प्रसन्न ।

परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न वचे ॥७०॥

तैसी नव्हे तुमची बुद्धी । दीनदयाळ त्रिशुद्धी ।

तूं तंव केवळ कृपानिधी । ऐक तो विधी सांगेन ॥७१॥

तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिलें गुह्यज्ञान ।

ध्रुव बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥७२॥

प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हां ।

तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसांवा दीनांसी ॥७३॥

केवळ वाटपाडा देख । भजनेंवीण एकाएक ।

महाकवि केला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥७४॥

देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी ।

ऐसा तूं कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥७५॥

वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि सांडविशी त्याचें पाप ।

शेखीं सायुज्याचे दीप । दाविशी सद्रूप दयाळुवा ॥७६॥

तुम्ही अच्युतात्मे निजनिर्धारीं । म्हणौनि देवो तुमचा आज्ञाधारी ।

तुम्ही म्हणाल त्यातें उद्धरी । येर्‍हवीं हातीं न धरी आनातें ॥७७॥

ऐसा तूं दीनदीक्षागुरु । ब्रह्मज्ञानें अतिउदारु ।

तरी पुसेन तो विचारु । निजनिर्धारु सांगावा ॥७८॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel