श्रीशुक उवाच -

स एव मुक्तो हरिमेधसोद्धवः प्रदक्षिणं त्म परिसृत्य पादयोः ।

शिरो निधायाश्रुकलाभिरार्द्रधीर्न्यषिंचदद्वन्द्वपरोप्यपक्रमे ॥४५॥

जो निजमोक्षें नित्य निष्काम । जेणें अनुभविलें परब्रह्म ।

त्या श्रीशुकासी अतिसंभ्रम । उद्धवाचें प्रेम वर्णावया ॥५९॥

तो शुक म्हणे परीक्षिती । उद्धव आज्ञापिला श्रीपती ।

त्याच्या प्रेमाची अद्भुत स्थिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥८६०॥

उद्धव जरी जाहला गुणातीत । तरी गुरुचरणीं प्रेम अद्भुत ।

ज्यासी सद्गुरु श्रीकृष्णनाथ । मूर्तिमंत परब्रह्म ॥६१॥

त्यजूं न शके हरिपदा । हरीचे ठायीं पूर्ण श्रद्धा ।

यालागीं जाण ’हरिमेधा’ । बोलिजे प्रबुद्धा उद्धवातें ॥६२॥

जो आवडीं करी हरीचें ध्यान । त्याचे ध्यानेंसीं हरि हरी मन ।

जो विवंची श्रीकृष्ण समाधान । त्याचे बुद्धीचें हरण हरि करी ॥६३॥

जो करी हरिचिंतन । त्याचे चित्ताचें हरि करी हरण ।

जो करी हरीचें स्मरण । त्याचा संसार संपूर्ण हरि हरी ॥६४॥

ऐशिया हरीच्या ठायीं सर्वदा । पावलियाही मुक्तिपदा ।

उद्धवाची सप्रेम श्रद्धा। यालागीं ’हरिमेधा’ त्यासी म्हणती ॥६५॥

जे पावले गुणातीतीं । त्यांसीही आवडे ज्याची भक्ती ।

तेणें श्रीकृष्णें उद्धवाप्रती । प्रयाण निश्चितीं नेमिलें ॥६६॥

दुरी प्रयाण बदरिकाश्रम । मागुता न भेटे पुरुषोत्तम ।

तो प्रयाणकाळ उपक्रम । जाहला सप्रेम उद्धवासी ॥६७॥

सर्वदा सुखदुःखातीत । उद्धव जाहलासे निश्चित ।

तोही प्रयाणकाळीं प्रेमयुक्त । प्रदक्षिणा करीत श्रीकृष्णासी ॥६८॥

चरणीं मस्तक ठेवितां जाण । आनंदाश्रु लोटले नयन ।

तेणें श्रीकृष्णाचें चरणक्षाळण । जाहलें संपूर्ण पदद्वया ॥६९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel