शोकहर्षभयक्रोधलोभमोहस्पृहादयः ।

अहंकारस्य दृश्यन्ते, जन्ममृत्युश्च नात्मनः ॥१५॥

देहाभिमानाचे पोटीं । अनेक दुःखांचिया कोटी ।

त्यांची संकळितें गुणगोठी । कृष्ण जगजेठी सांगत ॥७७॥

देहाभिमानाचें कार्य एथ । अद्वैतीं वाढवी द्वैत ।

इष्टानिष्टीं समस्त । जग व्याप्त तेणें कीजे ॥७८॥

नश्वरा इष्टाचा नाश देख । तेणें देहअहंता मानी दुःख ।

या नांव गा ’शोक’ । सकळही लोक मानिती ॥७९॥

नश्वर विषयांची प्राप्ती । तेथें आल्हाद उपजे चित्तीं ।

त्या नांव ’हर्ष’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१८०॥

बळी मिळोनि समर्थ । आप्त विषयो विभांडूं पाहात ।

तेणें कासावीस होय चित्त । ’भय’ निश्चित या नांव ॥८१॥

आप्तकामाचें अवरोधन । ज्याचेनि अणुमात्र होय जाण ।

त्याचें करुं धांवे हनन । ’क्रोध’ संपूर्ण त्या नांव ॥८२॥

गांठी झाल्याही धनकोडी । कवडी वेंचितां प्राण सोडी ।

या नांव ’लोभाची’ बेडी । कृपण-परवडी पुरुषाची ॥८३॥

कर्माकर्म हिताहित । इष्टानिष्ट नाठवी चित्त ।

विवेकशून्य स्तब्धता प्राप्त । ’मोह’ निश्चित या नांव ॥८४॥

नित्य करितां विषयसेवन । मनीं विषयइच्छा गहन ।

अखंड विषयांचें ध्यान । ’स्पृहा’ जाण ती नांव ॥८५॥

इत्यादि हे नाना गुण । अथवा कां जन्ममरण ।

आत्म्यासी संबंध नाहीं जाण । हें देहाभिमान स्वयें भोगी ॥८६॥

जागृति आणि देखिजे स्वप्न । तेथ वसे देहाभिमान ।

ते ठायीं हे दिसती गुण । सुषुप्तीस जाण गुण नाहीं ॥८७॥

जेथ वृत्ति निरभिमान । तेथ जन्ममरणादि हे गुण ।

सर्वथा नुठती जाण । गुणासी कारण अभिमान ॥८८॥

जळीं स्थळीं वायु झगटी । जळीं तरंग स्थळीं नुठी ।

तैं तरंगता जळाचे पोटीं । तेवीं शोकादि गुणकोटी अहंतेमाजीं ॥८९॥

बद्धता झाली अहंकारासी । म्हणसी मुक्ति व्हावी त्यासी ।

ते अहंता लागली जीवासी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥१९०॥

अंत्यजाचा विटाळ ज्यासी । गंगास्नानें शुद्धत्व त्यासी ।

तें गंगास्नान अंत्यजासी । शुद्धत्वासी अनुपयोगी ॥९१॥

तेवीं अहंता जडली जीवासी । ते त्यागितां मुक्तत्व त्यासी ।

परी मुक्तत्व अहंकारासी । कल्पांतेंसीं घडेना ॥९२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel