श्रीभगवानुवाच-योगास्त्रयो मया प्रोक्ता, नृणां श्रेयो विधित्सया ।

ज्ञानं कर्म च भक्तिश्च, नोपायोऽन्योस्ति कुत्रचित् ॥६॥

तेथ मेघगंभीरा वाणी । गर्जोनि बोले शार्ङगपाणी ।

माझे परम कृपेवांचूनी । माझी वेदवाणी कळेना ॥६६॥

वेदशास्त्रार्थें अतिसंपन्न । जरी झाले अतिसज्ञान ।

परी माझ्या अनुग्रहेंवीण । माझा वेदार्थ जाण कळेना ॥६७॥

ब्रह्मा चहूं मुखीं वेद पढे । त्यासीही वेदार्थाचें चोखडें ।

वर्म नातुडेचि धडफुडें । मा इतर बापुडे ते किती ॥६८॥

ब्रह्मा वेदार्थ आकळिता । तैं शंखासुर वेद कां नेता ।

ब्रह्मा वेदार्थी लीन होता । तैं नाभिलाषिता सरस्वती ॥६९॥

माझा वेदाचा वेद्य निर्धार । तुज मी सांगेन साचार ।

ऐक उद्धवा सादर । वेदविचार तो ऐसा ॥७०॥

माझ्या वेदासी नाहीं बहु बंड । वृथा न बोले उदंड ।

ज्ञान-भक्ति-कर्मकांड । वेद त्रिकांड नेमस्त ॥७१॥

माझिया वेदांची वेदोक्ती । या तिंही योगांतें प्रतिपादिती ।

यावेगळी उपायस्थिती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥७२॥

कोण ते तिनी योग । कैसे अधिकाराचे भाग ।

तेही पुसशी जरी चांग । तरी ऐक साङग सांगेन ॥७३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel