एवं बृहद्व्रतधरो ब्राह्मणोऽग्निरिव ज्वलन् ।

मद्‍भक्तस्तीव्रतपसा दग्धकर्माशयोऽमलः ॥३६॥

यापरी जो ब्रह्मचारी । महाव्रतें व्रत धरी ।

मद्‍भावना भूताकारीं । धारण धरी अनिश्रम ॥६२॥

यापरी करितां मद्‍भजना । जळाल्या कर्मबीजेंसीं वासना ।

तेव्हां पूर्ण भक्ति माझी जाणा । वरी अंतःकरणा भक्तांच्या ॥६३॥

तेव्हां निरुपचार निजस्थिती । सहजचि घडे माझी भक्ति ।

तेथ ज्या ज्या देखे दृष्य व्यक्ती । मद्‍भावप्रतीती चिद्‌रूपें ॥६४॥

ऐशी घडतां माझी भक्ती । आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।

यांची उठवूनिया पंक्ती । चिन्मात्रैक चौथी भक्ती तो लाभे ॥६५॥

साचचि जे भक्तिच्या ठायीं । चारी मुक्ती लोळती पायीं ।

जो स्वानंद मद्‍भक्तांच्या देहीं । संपूर्ण पाहीं उल्हासे ॥६६॥

तेव्हां मज व्हावी मुक्तता । हेंही नाठवे त्याच्या चित्ता ।

हो कां `गेली माझी बद्धता' । हेंही सर्वथा स्मरेना ॥६७॥

एवं माझेनि भजनसुखें । विसरला सकळ सुखदुःखें ।

माझे भक्तिचेनि हरिखें । स्वानंदतोखें संतुष्ट ॥६८॥

ऐसा नैष्ठिक ब्रह्मचारी । मज पावला स्वधर्मेंकरीं ।

आतां उपकुर्वाणाची परी । ऐक दुसरी अवस्था ॥६९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel