केचित्षडिंवशतिं प्राहुरपरे पंचविंशतिम् ।
सप्तैके नव षट् केचिच्चत्वार्येकादशापरे ॥२॥
केचित्सप्तदश प्राहुः, षोडशैके त्रयोदश ।
एतावत्त्वं हि संख्यानामृषयो यद्विवक्षया ॥३॥
येथ तत्त्वसंख्या मतवाद । ऋषीश्वरांमाजीं विवाद ।
त्या विवादाचे शब्द । ऐक विशद सांगेन ॥४०॥
एक म्हणे तत्त्वें ’सव्वीस’ । दुजा म्हणे उगा बैस ।
बहु बोलावया नाहीं पैस । तत्त्वें ’पंचवीस’ नेमस्त ॥४१॥
तिजा म्हणे तुम्हीं येथ । कैसेनि वाढविलें स्वमत ।
तत्त्वें नेमस्तचि ’सात’ । कैंचीं बहुत बोलतां ॥४२॥
एक म्हणे हें अभिनव । बोलतां न लाजती मानव ।
वृथा बोलाची लवलव । तत्त्वें ’नव’ नेमस्त ॥४३॥
तंव हांसोनि बोले एक । सांपे सज्ञान झाले लोक ।
मिथ्या बहु तत्त्वजल्पक । ’तत्त्वषटूक’ नेमस्त ॥४४॥
एक म्हणती परते सरा । नेणा तत्त्वसंख्याविचारा ।
तत्त्वें नेमिलींच ’अकरा’ । बडबड सैरा न करावी ॥४५॥
दुजा म्हणे तत्त्वविचारा । नेणोनि धरिसी अहंकारा ।
पुसोनियां थोरथोरां । तत्त्वें ’सतरा’ नेमस्त ॥४६॥
एक म्हणे व्युत्पत्तिबळा । कां व्यर्थ पिटाल कपाळा ।
न कळे भगवंताची लीळा । तत्त्वें ’सोळा’ नेमस्त ॥४७॥
एक म्हणे या गर्वितां पोरां । कोण पुसे तत्त्वविचारा ।
तत्त्वें नेमस्तचि ’तेरा’ । निजनिर्धारा म्यां केलें ॥४८॥
एक म्हणे सांडा चातुरी । तत्त्वें नेमस्तचि ’चारी’ ।
दुजा म्हणे या कायशा कुसरी । तत्त्वें निर्धारीं ’दोनचि’ ॥४९॥
तिजा म्हणे वाचाट लोक । कोणें धरावें यांचें मुख ।
निजनिर्धारीं तत्त्व ’एक’ । एकाचा अनेक विस्तार ॥५०॥
एवं मतपरंपरा नाना मतीं । ऋषीश्वरीं वेंचितां युक्ती ।
तुझ्या तत्त्ववादाची निश्चिती । कोणें इत्थंभूतीं मानावी ॥५१॥
गायन्ति पृथगायुष्मन्निदं नो वक्तुमर्हसि
वेंचूनि युक्तीचे संभार । तत्त्वविचार बोलती ॥५२॥
स्वामीनें सांगितलें तत्त्व एक । ऋषीश्वर बोलती अनेक ।
येचिविषयींचें निष्टंक । मज आवश्यक सांगावें ॥५३॥
एवं या तत्त्वनिश्चयासी । मज सांगावया योग्य होसी ।
ऐसा विनविला हृषीकेशी । तो उद्धवासी तुष्टला ॥५४॥
जीं जीं ऋषीश्वर बोलती । तीं तीं तत्त्वें सत्य होतीं ।
हें सर्वज्ञ ज्ञाते जाणती । तेचि अर्थी हरि बोले ॥५५॥