केचिद्देहमिमं धीराः, सुकल्पं वयसि स्थिरम् ।

विधाय विविधोपायैरथ युञ्जन्ति सिद्धये ॥४१॥

देहो तितुका प्रारब्धाधीन । त्यासी प्रारब्धें जन्ममरण ।

त्या देहासी अजरामरपण । पामर जन करुं पाहती ॥४२॥

त्या प्रारब्धाचें सूत्र पूर्ण । सर्वदा असे काळधीन ।

यालागीं काळकृत जन्ममरण । सर्वांसी जाण सर्वदा ॥४३॥

चौदा कल्प आयुष्य जोडी । त्या मार्कंडेयासी काळ झोडी ।

युगांतीं लोम झडे परवडी । त्या लोमहर्षाची नरदी मुरडिजे काळें ॥४४॥

चतुर्युगसहस्त्र संख्येसी । तो दिवस गणिजे ब्रह्मयासी ।

जो स्त्रजिता सकळ सृष्टीसी । त्यासी काळ ग्रासी स्वबळें ॥४५॥

स्त्रजित्या ब्रह्मयासी काळ पिळी । पाळित्या विष्णूतें काळ गिळी ।

प्रलयरुद्राचीही होळी । काळ महाबळी स्वयें करी ॥४६॥

यापरी काळ अति दुर्धर । नेणोनि अविवेकी नर ।

वांछिती काळजयो पामर । देह अजरामर करावया ॥४७॥

जें जें दिसे तें तें नासे । हे काळ सत्ता जगासी भासे ।

तरी अजरामरत्वाचें पिसें । मूर्ख अतिप्रयासें वांछिती ॥४८॥

थिल्लरींचा तरंग जाण । वांच्छी अजरामरपण ।

तंव थिल्लरासचि ये मरण । तेथ वांचवी कोण तरंगा ॥४९॥

तेवीं संसारचि नश्वर । त्यांतील देह अजरामर ।

करुं वांछिती पामर । उपायीं अपार शिणोनी ॥६५०॥

देह जाईल तरी जावो । परी जीव हा चिरंजीव राहो ।

तदर्थ कीजे उपावो । तैसें अमरत्व पहा हो नरदेहा ॥५१॥

देह केवळ नश्वर । त्यातें अविवेकी महाधीर ।

करुं म्हणती अजरामर । उपायीं अपार शिणोनी ॥५२॥

केवळ काळाचें खाजें देहो । तो अमर करावया पहा हो ।

जो जो कीजे उपावो । तो तो अपावो साधकां ॥५३॥

एवं मूढतेचे भागीं । देहाच्या अमरत्वालागीं ।

शिणोनि उपायीं अनेगीं । हठयोगी नागवले ॥५४॥

परकायाप्रवेशार्थ जाण । शिणले साधितां प्राणधारण ।

एवं धरितां देहाभिमान । योगीजन नाडले ॥५५॥;

देहाचें नश्वरपण । जाणोनियां जे सज्ञान।

ते न धरिती देहाभिमान । तेंचि निरुपण हरि सांगे ॥५६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel