धनं च धर्मैकफलं यतो वै, ज्ञानं सविज्ञानमनुप्रशान्ति ।

गृहेषु युञ्जन्ति कलेवरस्य, मृत्युं न पश्यन्ति दुरन्तवीर्यम् ॥१२॥

नायकोनि भगवत्कथा । ज्ञानाभिमानी नाडले तत्त्वतां ।

धनें परमार्थ यावा हाता । तोही स्वधर्मता न लाविती धर्मीं ॥४२॥

विषयांचिया कामना । सर्वस्वें वेंचिती धना ।

तेंचि धर्मार्थ वेंचितां जाणा । सांडिती प्राणा कवडीसाठीं ॥४३॥

जया धनाचेनि पांगें । हा धर्मचि आलासे निजांगें ।

जेवीं पायाळाचेनि योगें । महानिधि वेगें आतुडे हातीं ॥४४॥

बीज तेथें सद्रुम फळ । चंदन तेथें परिमळ ।

जळाचे ठायीं केवळ । नांदती सकळ रसस्वाद ॥४५॥

देह तेथ असे कर्म । रूप तेथ वसे नाम ।

धन तेथ उत्तमोत्तम । सकळ धर्म सदा वसती ॥४६॥

जेवीं एकादशीव्रतयोगें । जागरीं गीतनृत्यपांगें ।

तुष्टला देवो लागवेगें । आतुडे धनयोगें निजभक्तां करीं ॥४७॥

तेवीं धनाचिया पाठोवाठीं । परम धर्मेंसी पडे गांठी ।

धर्म तेथ उठाउठी । ज्ञानाची भेटी विज्ञानेंसीं ॥४८॥

चंद्रास्तव वाढती कळा । जीवनास्तव जिव्हाळा ।

तेवीं धनास्तव सोज्जळा । धर्माचा सोहळा धार्मिकां घरीं ॥४९॥

धर्म तेथ शुद्ध ज्ञान । ज्ञान तेथ विज्ञान ।

विज्ञान तेथ समाधान । शांति संपूर्ण नांदे तेथ ॥२५०॥;

एवढें फळ ज्या धनापासीं । तें मूर्ख वेंचिती विषयांसी ।

देहलोभें भुललीं पिसीं । अंगीच्या मृत्यूसी विसरले ॥५१॥

जळते घरीं ठेवा ठेवणें । मरत्या देहा सुरवाड करणें ।

तो नागवला वेदु म्हणे । तें वेदाचें बोलणें नायके कोणी ॥५२॥

उपजलेनि दिवस-दिवसें । देहातें काळु ग्रासीतसे ।

हें नित्य नवें मरण कैसें । देहलोभवशें विसरले ॥५३॥

ज्याचे त्या देखतां कैसा । काळु गिळी बाळवयसा ।

मग तारुण्याची दशा । मुरडूनि घसा ग्रासी काळ ॥५४॥

गिळोनियां तारुण्यपण । आणी वार्धक्य कंपायमान ।

ऐसें काळाचें विंदान । दुर्धर पूर्ण ब्रह्मादिकां ॥५५॥

जयाचेनि चपेटघातें । मरण आणी अमरांतें ।

मा मूर्ख तेथें जीवितातें । अक्षय चित्तें दृढ मानिती ॥५६॥

मूळीं देहचि तंव अनित्य । मा तेथींचे भोग काय शाश्र्वत ।

परी धन वेंचूनि विषयार्थ । भुलले जाणा भ्रांत स्त्रीलोभें ॥५७॥

ऐसे नश्र्वर भोग जगीं । ते भोगावया रिघावें स्वर्गीं ।

तदर्थ प्रवर्तती यागीं । लागवेगीं भोगेच्छा ॥५८॥

सुख भोगावया वेगीं । पतंगु जेवीं उडी घाली आगीं ।

तेवीं इहामुत्रभोगीं । पतनालागीं पावती ॥५९॥

स्त्री-आमिष-मद्यपान । हे वेदोक्त भोग जाण ।

तेथ केवीं घडे पतन । तें वेदविधान नेणती मूर्ख ॥२६०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel