उद्धव उवाच-कति तत्त्वानि विश्वेश संख्यातान्यृषिभिः प्रभो ।

नवैकादश पञ्चत्रीण्यात्थ त्वमिह शुश्रुम ॥१॥

विश्वात्मका विश्वेश्वरा । विश्वधारका विश्वंभरा ।

विश्वसाक्षी विश्वाकारा । विश्वैकसुंदरा श्रीकृष्णा ॥२८॥

तुज विश्वात्मक म्हणतां । जड मलिन एकदेशिता ।

आली म्हणशी अज्ञानता । यालागीं प्रभुता उपपादी ॥२९॥

जड मलिन अज्ञानता । हे मायेस्तव होती तत्त्वतां ।

ते मायेचा तूं नियंता । हे अगाध प्रभुता पैं तुझी ॥३०॥

ऐशिया संबोधनद्वारा । विनवूनि स्वामी शारंगधरा ।

तत्त्वसंख्येच्या विचारा । निजनिर्धारा पुसत ॥३१॥

जे तपःसामर्थ्यें समर्थ थोर । अनागतद्रष्टे ऋषीश्वर ।

त्यांची तत्त्वसंख्या विचित्र । पृथक्‌पृथगाकारें बोलती ॥३२॥

तत्त्वसंख्या इत्यंभूत । एकुणिसाव्या अध्यायांत ।

तुम्हींच निरुपला तत्त्वार्थ । तोचि वृत्तांत सांगत ॥३३॥

(पूर्वश्लोकार्ध-"नवैकादशपंचत्रीनू" ) चौदावे श्लोकींच्या निरुपणीं । हे अठ्‌ठावीस तत्त्वगणनी ।

सांगितली शार्ङगपाणी । मजलागोनी निश्चित ॥३४॥

ये तत्त्वसंख्येचा विचार । प्रकृति पुरुष महदहंकार ।

पंच महाभूतें थोर । हा संख्याप्रकार नवांचा ॥३५॥

दाही इंद्रियें अकरावें मन । पंच विषय तीन्ही गुण ।

हें अठ्‌ठावीस संख्यागणन । स्वमुखें आपण निरुपिलें ॥३६॥

यापरी गा लक्ष्मीपती । हे मुख्यत्वें तुझी तत्त्वोक्ती ।

आतां ऋषीश्वरांच्या युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥३७॥

ते तूं ऐक गा निश्चित । तुज सांगेन तयाचा अर्थ ।

म्हणोनियां निरुपित । स्वयें मनोगत उद्धव ॥३८॥

म्हणे तत्त्वतां अवधारीं । मी सांगेन एक कुसरी ।

प्रकृतिपुरुषांमाझारीं । विचित परी सांगत ॥३९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel