परकायं विशन् सिद्ध आत्मानं तत्र भावयेत् ।

पिण्डं हित्वा विशेत्प्राणो वायुभूतः षडङ्‌घ्रिवत् ॥२३॥

परकायप्रवेशू करितां जाणा । आवरूनि स्वदेहींच्या सर्व प्राणां ।

जेथ प्रवेश करितां आपणा । तेथ आपुली भावना करावी ॥२३॥

तेव्हां लिंगदेहाचे माथां । जीवप्राणांची एकात्मता ।

धरोनि देहांतर‍अहंता । बाह्य वायूच्या पंथा मिळोनि जाय ॥२४॥

तेथ मिळातांचि मिळवणी । या देहाचा अभिमान सांडुनी ।

देहांतरीं प्रवेशोनी । मी म्हणोनी उठे तेथें ॥२५॥

जैसें कमळींहूनि कमळांतरा । वायुबळें प्रवेशणें भ्रमरा ।

तैसें सांडोनियां स्वशरीरा । देहांतरा जीवू जाये ॥२६॥

हें परकायप्रवेशन । म्यां सांगीतलें संपूर्ण ।

माझिया स्वरूपाचें धारण । तें निजलक्षण अवधारीं ॥२७॥

दृढ ध्यातां माझे स्वरूपासी । तैं सर्व देहीं तूंचि आहेसी ।

न सांडितां निजदेहासी । हा परकायेंसीं प्रवेशू ॥२८॥

स्वसत्ता स्वदेह सांडणें । तेचि अर्थीचीं लक्षणें ।

पुढिले श्लोकीं नारायणें । विशद निरूपणें निरूपिलीं ॥२९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel