स्वमायया सृष्टमिदं सदसल्लक्षणं विभुः ।

प्रविष्ट ईयते तत्तत्सरूपोऽग्निरिवैधसि ॥४७॥

अग्नि सहजें निराकार । त्यासी काष्ठानुरूपें आकार ।

दीर्घ चक्र वर्तुल थोर । नानाकार भासतु ॥४॥

तैसीचि भगवंताची भक्ती । स्वमायाकल्पित कल्पनाकृती ।

तेथ प्रवेशला सहजस्थितीं । बहुधा व्यक्ती तो भासे ॥५॥

जैसें गंगेचें एक जळ । भासे भंवरे लहरी कल्लोळ ।

तैसा जगदाकारें अखिळ । भासे सकळ जगदात्मा ॥६॥

कां छायामंडपींच्या चित्रासी । दीपप्रभा भासे जैसी ।

राम रावण या नांवेंसी । दावी जगासी नटनाट्य ॥७॥

तैशा नानाविधा व्यक्ती । नाना मतें नाना कृती ।

तेथ प्रवेशोनि श्रीपती । सहजस्थितीं नाचवी ॥८॥

तैशा योगियाची स्थिती । पाहता नानाकार व्यक्ती ।

आपणियातें देखे समवृत्ती । भेदभ्रांति त्या नाहीं ॥९॥

तेथ जें जें कांहीं पाहे । तें तें आपणचि आहे ।

या उपपत्ती उभवूनि बाहे । सांगताहे अवधूतु ॥५१०॥

या देहासी जन्म नाशु । आत्मा नित्य अविनाशू ।

हा दृढ केला विश्वासू । गुरु हिमांशू करूनि ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel