आदौ कृतयुगे वर्णो नृणा हंस इति श्रृतः ।

कृतकृत्याः प्रजा जात्या तस्मात्कृतयुगं विदुः ॥१०॥

वेदः प्रणव एवाग्रे धर्मोऽहं वृषरूपधृक् ।

उपासते तपोनिष्ठा हंसं मां मुक्तकिल्बिषाः ॥११॥

पूर्वील कृतयुगींचें लक्षण । तैं नव्हते गा चारी वर्ण ।

बहुशाखा वेदपठण । कर्माचरण तैं नाहीं ॥६३॥

तैं सकळ मनुष्यांसी जाण । `सोहंहंसा' चें अखंड ध्यान ।

यालागीं `हंस' हा एकचि वर्ण । सर्वांसही जाण ते काळीं ॥६४॥

तैं `प्रणवमात्रें' वेदपठण । वृषरूपें मी आपण ।

धर्म चतुष्पाद संपूर्ण । अधर्माचें जाण नांवही नाहीं ॥६५॥

ते काळीं श्रेष्ठ सत्त्वगुण । यालागीं सत्यवादी जन ।

अवघे धर्मपरायण । कपट तैं जाण जन्मलें नाहीं ॥६६॥

परद्रव्य आणि परदारा । यांच्या अभिलाषाचा थारा ।

स्पर्शला नाहीं जिव्हारा । ते काळींच्या नरां धर्मिष्ठां ॥६७॥

ते काळींच्या जना धर्मिष्ठां । `सोहंहंसा' ची आत्मनिष्ठा ।

हेंचि भजन मज वरिष्ठा । `तपोनिष्ठा' तया नांव ॥६८॥

तैं स्वर्गा जावें हे नाहीं कथा । नेणती नरकाची वार्ता ।

अधर्माची अवस्था । स्वप्नीहीं चित्ता स्पर्शेना ॥६९॥

यापर प्रजा समस्त । स्वधर्मस्वभावें कृतकृत्य ।

यालागीं जाण निश्चित । त्यातें बोलिजेत `कृतयुग' ॥७०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel